मुंबई : ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तर नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर नगरपालिकेसाठी मतदान होतंय.
ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 106 गणांसाठी हे मतदान होत आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांत हे मतदान होत आहे. तर उद्या मतमोजणी होणार आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर नगरपालिकेसाठी मतदान होतंय. मतदानासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केलीय. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवलंय. दोन ड्रोन कॅमेरे या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत, तर सातशे वर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या मतदान प्रक्रियेवर करडी नजर ठेवणार आहेत.
निपक्षपाती मतदान पार पडावे यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत रंगात आहे. एकीकडे वर्षानुवर्षे मतदारांनी काँग्रेसवर दाखवलेला विश्वास आहे तर दुसरीकडे डॉ विजयकुमार गावित आणि डॉ. हीना गावित या पिता पुत्रीकडे भाजपाची कमांड असल्याने निवडणुकीचा हा फड चांगलाच रंगला होता. त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार याकडं सा-यांच्या नजरा लागल्यात. नवापूर आणि नंदुरबारमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येत आणि अमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलंय.