Pune News Today: पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत काम करण्याऱ्या 28 वर्षीय तरुणीवर निर्घृणपणे चाकुने वार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली आहे. तरुणीच्या सहकाऱ्यानेच कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्यावर हल्ला केला. आरोपीचे पैसे थकवल्यामुळं त्याने तिच्यावर वार केले मात्र हा वार इतका जबर होता ती अतिरक्तस्त्रावामुळं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपीने जेव्हा तरुणीवर हल्ला केला तेव्हा तरुणीने तिच्या वडिलांना फोन केला होता. तेव्हा आरोपीनेदेखील तिच्या वडिलांशी बातचीत केली होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर आरोपी काही महिन्यांपूर्वी तरुणीच्या गावालादेखील जाऊन आला होता. कृष्णा सत्यनारायण कनोजा असं या आरोपीचे नाव असून या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नामांकित आयटी कंपनीचे कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर चाकूने वार झाला. चाकूचा वार इतका गंभीर होता की त्यात तरुणीचा हात हा कोपऱ्यापासून तुटला होता. उपचारादरम्यान अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू झाला. ही महिला याच कंपनीत अकाउंटचं काम पाहत होती. धक्कादायक बाब म्हणजे पैशाच्या वादावरून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याच समोर आलय. हल्ला करणारा आरोपी तिचाच सहकारीने होता. तरुणी आणि सहकारी हल्लेखोर यांच्यात उसने दिलेल्या पैशावरून वाद झाला होता.
तरुणीने वडील आजरी आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे हे सांगून तिने कृष्णा कडून कधी २५ हजार तर कधी ५० हजार असे एकूण ४ लाख रुपये उकळले. एवढ्यावर न थांबता तिने आणखी पैसे कृष्णाला मागू लागल्याने त्याचा संशय बळावला. कृष्णाने थेट तिचे मूळ गाव कराड गाठले. तिच्या घरी जाताच कृष्णाच्या पायाखालची वाळू सरकली. तिचे वडील अगदी ठणठणीत होते. कृष्णाने त्यांना विचारले असता मी कुठला ही आजारी नाही आणि माझ्यावर कुठली ही शस्त्रक्रिया केली गेली नाही आणि होणार नाही असं त्यांनी सांगितलं. सत्य समोर आल्यावर कृष्णाने तिच्याकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. यातून त्यांचे अनेक वेळा वादावादी सुद्धा झाली.
मंगळवारी तरुणीला अद्दल घडावी हा मानस ठेवत थेट कंपनीच्या पार्किंग मध्ये तिला गाठले आणि तिच्या हातावर वार केला. या हल्ल्यात शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या. या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली परिणामी तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यात तिचा मृत्यु झाला. जेव्हा कृष्णाने तिच्या हातावर वार केला तेव्हाच तरुणीने तिच्या वडिलांना व्हॉट्सअॅप कॉल केला. तसंच तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. इतकंच नव्हे तर, आरोपी कृष्णानेदेखील तिच्या वडिलांसोबत फोनवर बोलणे केले. तेव्हाही त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णाला डोळ्यांचा गंभीर आजार होता. त्याची अलीकडेच एक शस्त्रक्रिया झाली होती. तसंच, त्या उपचारांसाठी त्याला पैशांची गरज भासायची. त्यामुळं त्यांला पैशांची गरज होती. त्याच रागातून त्याने तिच्यावर हल्ला केला.