सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात गेल्या वर्षी पकडल्या गेलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. पुण्यात तीन दहशतवाद्यांना पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असताना कोथरुड पोलिसांनी पकडलं होतं. तेव्हापासून या प्रकरणाचा एनआयए, एटीएसकडून तपास सुरु करण्यात आला. या दशतवाद्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी चोरी करुन त्याची चाचणी केल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर आता या दहशतवाद्यांनी कोंढव्यातच बॉम्ब बनविण्याची शाळा भरवल्याचे समोर आलं आहे.
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीया (आयसिस) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी कोंढव्यामध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं. यासोबत त्यांनी नियंत्रित पद्धतीत बॉम्ब ब्लास्ट देखील घडवून आणले होते. त्यासाठी त्यांनी पश्चिम घाटात रेकी केली होती. या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील तसेच गुजरातमधील मेट्रोसिटीमध्ये या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याचे समोर आलं आहे. या दहशतवाद्यांविरोधात तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. दहशतवाद्यांनी बॉम्ब बनविण्याचे (आईडी) प्रशिक्षण जेव्हा घेतले त्यावेळी त्यांनी त्या संबंधीच्या लेखी नोट्स काढल्या होत्या. त्या देखील एनआयएने तपासात जप्त केल्या आहेत. त्याबरोबर त्यांच्याकडून ड्रोन, चाकू, कपडे जप्त करण्यात आले. या दहशतवाद्यांनी त्यांचा परदेशातील आयसिसचा दहशतवादी हँडलर खलिफा याच्याकडून आयसिसशी संबंधित शपथ घेतली आहे.
पुण्यातील कोथरूड भागात जुलै 2023 मध्ये या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (वय 31, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी उर्फ छोटू (वय 24, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली होती. कोथरुड पोलिसांनी या दहशतवाद्यांना बाईक चोरताना पकडलं होतं. त्यानंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. एटीएसने तपासासाठी यापैकी शहानवाज, महंमद, झुल्फीकार यांना तपासासाठी ताब्यात घेतले होते.
दरम्यान, राजस्थानमधील चित्तोडगडमधील स्फोटके बाळगल्याचा गुन्ह्यात देखील या दहशतवाद्यांचा सहभाग होता. यांचा बंदी घातलेल्या अलसुफा संघटनेशी संबंध होता. या दहशतवाद्यांनी फरार दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबर त्यांना इम्प्रुव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आईडी) तयार करण्यासाठी पूर्व तयारी करवून घेतली होती.