'पर्यायी सरकार' देण्यासाठी उद्या शरद पवार-सोनिया गांधींची बैठक

तब्बल २ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली आहे.

Updated: Nov 17, 2019, 08:15 PM IST
'पर्यायी सरकार' देण्यासाठी उद्या शरद पवार-सोनिया गांधींची बैठक title=

पुणे : तब्बल २ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली आहे. पर्यायी सरकार आलं पाहिजे, असा आमचा निष्कर्ष असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठक संपल्यानंतर दिली. तसंच शरद पवार आणि सोनिया गांधी यांची उद्या दिल्लीमध्ये भेट होणार आहे. या भेटीमध्ये पर्यायी सरकारबाबत दोघंही चर्चा करतील अशी माहिती नबाव मलिक यांनी दिली आहे.

सोमवारी सोनिया गांधी-शरद पवार यांच्या बैठकीनंतर मंगळवारी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते चर्चा करुन पुढे काय करायचं याची भूमिका ठरवतील, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेससोबत लढलो, त्यामुळे पुढचा निर्णय काँग्रेससोबत चर्चा करुन घेऊ, असं वक्तव्य मलिक यांनी केलं आहे.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड हे दिग्गज नेते उपस्थित होते. पण राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले प्रफुल्ल पटेल या बैठकीला गैरहजर होते. त्यांना निमंत्रण नव्हतं की अन्य काही कारणामुळे ते गैरहजर राहिले, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र शिवसेनेसोबत जाण्यावरून पटेल यांची भूमिका कायमच संदिग्ध राहिली आहे. त्यामुळे त्यांना या बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

ज्या भाजपाविरोधात लढलो त्या पक्षासोबत जाण्याला मर्यादा आहेत, असं सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीला आले असताना पाटील यांनी भाजपासोबत जाण्याची शक्यता पूर्णतः फेटाळली नाही. शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात 'दगडापेक्षा वीट मऊ' अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यात सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवारच याबाबत निर्णय घेतील, असंही पाटील म्हणालेत.