ऋचा वजे, झी मीडिया, मुंबई : मी धर्मविरोधी नाही पण धर्माभिमानी आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा मात्र, धर्म घरात ठेवावा. रस्त्यावर आणू नका. मशिदीवर जे भोंगे लागले आहेत. कुठून आले ते, कोणत्या नियमात लिहिलंय? हे भोंगे काढावेच लागतील. नाही काढले तर.. आताच सांगतोय.. मस्जिदीवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात हा इशारा दिला आणि त्यांचा 'हा' इशारा आदेश मानून त्याचे पालन करण्यास मनसैनिकांनी सुरुवात केलीय. चांदिवली येथील मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी आपल्या पक्ष कार्यालयासमोर लाऊडस्पीकर लावले असून त्यावर हनुमानचालीसा वाजविण्यात येत आहे.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार घाटकोपर येथील चांदिवली परिसरात हे लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात येथे मनसे कार्यकर्ते झाले आहेत. हनुमानचालिसा आणि गायत्री मंत्राचे पवित्र सूर या परिसरात उमटत आहेत.
यासंदर्भात झी २४ तासच्या प्रतिनिधी ऋचा वजे यांच्याशी बोलताना विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी सांगितले की, पक्ष कार्यालयासमोर दोन लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. त्यावर हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र लावण्यात आले आहेत.
काल राजसाहेब यांचा आदेश आला. त्याचे आम्ही पालन करत आहोत. हे फक्त आजचा दिवस वाजणार नाही. तर, रोज वाजविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मशीदीवरील भोंगे हटवायचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे पालन होत नाही. त्यांनी त्यांच्या धर्माचे पालन करावे.
आम्हीही आमच्या धर्माचे पालन करत आहोत. माझ्या धर्माचे पालन करण्याचा मला अधिकार आहे. त्यांना स्पिकरवरून अजाण म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांना विरोध नाही. पण, आम्हीही आमच्या धर्माचे पालन करत असू तर त्यात गैर काय असा सवाल त्यांनी केला.