मुंबई : महाराष्ट्रातील दूधदरवाढीचं आंदोलन आणखी चिघळत चाललं आहे. खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपल्या समर्थकांसह गुजरात सीमेवरील टँकर गुजरातमध्ये परत पाठवले आहेत. गुजरातहून महाराष्ट्रात येणार २५ टँकर राजू शेट्टी यांनी पुन्हा गुजरातमध्ये परतवले आहेत. राजू शेट्टी यांनी या आधीचं गुजरातमधील दूध पुरवठा बंद करण्याची मागणी केली होती.
शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी देखील गुजरातमधून महाराष्ट्रात येणारं दूध बंद करण्याची मागणी केली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून महाराष्ट्राभरात दूध आंदोलनाला सुरूवात केली आहे. आज दूधकोंडी फुटली नाही तर उद्या दूध वितरण शक्य होणार नसल्याचं पुण्यात संबंधित दूध संकलकांनी सांगीतलय.
पुण्यात चितळे दुधाचं सर्वाधिक वितरण होतं. चितळेंकडे दिवसाला सुमारे साडेसहा लाख लिटर दूध संकलन होतं. मात्र त्यांचं दूध संकलन दोन दिवस बंद आहे.