पनवतीचे किस्से त्यामुळे 'रामटेक' नकोसे! कोणत्या मंत्र्याच्या वाट्याला येणार हा बंगला?

Ramtek Bunglow:  रामटेकनं साल 2000 नंतर फारसा कुणाला राजकिय टेक ऑफ दिलेला नाही. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 24, 2024, 09:16 PM IST
पनवतीचे किस्से त्यामुळे 'रामटेक' नकोसे! कोणत्या मंत्र्याच्या वाट्याला येणार हा बंगला? title=
रामटेक बंगला

Ramtek Bunglow: महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या बहुप्रतिक्षित खातेवाटपानंतर आता मंत्र्यांच्या सरकारी बंगलेवाटपाची जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री अशी उतरंड असलेल्या सरकारमध्ये, सरकारी बंगला हा प्रतिष्ठेचा विषय असतो. मात्र मंत्र्यांसाठीचा असाच एक बंगला सध्या चांगलाच चर्चेत आहे. नेमका कोणता आहे हा बंगला आणि काय आहे त्याची रंजक कहाणी? जाणून घेऊया. 

एका बाजुला 'सागर', दुस-या बाजूला 'देवगिरी'.. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाही शेजार लाभलेला 'रामटेक' बंगला... समुद्रकिना-याचा खारा वारा पित हा जूना आणि प्रशस्त बंगला तसा दिसायला दिमाखदार. पण, एवढ्या दिमाखदार बंगल्यात राहायला येण्याकरता कोणताही मंत्री सहजासहजी तयार होत नाही. जो मंत्री येतो त्यांच्या मनात धाकधुक असतेच.जून्या धाटणीचं बांधकाम, समुद्रकिनारा लाभलेल्या या हवेशीर बंगल्याला ग्रहण लागावं आणि इथे राहायला येणा-यांना एवढ्या दिमाखदार बंगल्याची धास्ती वाटावी. जो मंत्री इथे राहायला येतो त्यांची काही ना काही कारणानं कोंडी होऊन अखेर त्यांना हा बंगला सोडावा लागावा अशी धारणा  राजकिय वर्तृळात ऐकीवात आहे.

या रामटेकनं साल 2000 नंतर फारसा कुणाला राजकिय टेक ऑफ दिलेला नाही. आणि आता महसुलमंत्रीपदी असणा-या चंद्रशेखर बावनकुळेंना सामान्य प्रशासन विभाकडून हा बंगला देण्यात आला. जबाबदारीचं खातं मिळालेल्या बावनकुळेंच्या गोटात रामटेकचा पूर्वइतिहास बघुन धाकधुक सुरु झाली.

सामान्य प्रशासनाच्या शासन निर्णयानुसार रामटेक चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाट्याला आला खरा. मात्र, पंकजा मुंडे आणि बावनकुळेंमध्ये बंगल्याची अदलाबदल होऊ शकते अशीही चर्चा सुरु झाली. रामटेक बंगल्यात एकेकाळी गोपिनाथ मुंडेंचं वास्तव्य होतं. त्यामुळे त्यांची लेक म्हणून पंकजा मुंडेंचं रामटेकशी भावनिक नातं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना शासननिर्णयानुसार मिळालेला पर्णकुटी बंगला आणि बावनकुळेंना मिळालेला रामटेक यांची या दोन मंक्र्यांमध्ये अदलाबदली केली जाईल असंही बोललं गेलं 

1978  साली शरद पवार यांनी वसंतदादांचं सरकार ह्या बंगल्यात वास्तव्यास असताना पाडलं होतं… तेव्हा पवारांनी दिलेल्या धक्क्याची जोरदार चर्चा होती… त्यामुळे पवारांनंतर हा बंगला गोपीनाथ मुंडे यांनी मागून घेतला होता… त्यानंतर मात्र, या जागी येणा-या प्रत्येक मंत्र्याची उतरती कळा रामटेकनं पाहीलीय.

रामटेक बंगल्याच्या इतिहास! 

विलासराव देशमुखांना 1995 नंतर रामटेक बंगला अशुभ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. 1995 ला रामटेकमध्ये विलासराव देशमुख वास्तव्यास होते आणि त्यांचा मोठा पराभव झाला.

छगन भुजबळांना आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला. तेलगी प्रकरण मोठं गाजलं. स्टॅम्पपेपर घोटाळ्यात भुजबळ यांचं नाव आलं. भुजबळांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

एकनाथ खडसेंना 2014मध्ये फडणवीस सरकारचे महसूलमंत्री एकनाथ खडसेंना रामटेकवर मुक्काम होता. भोसरी भूखंड घोटाळ्यात खडसेंवर आरोप झाले. एकनाथ खडसेंच्या पीएवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. एकनाथ खडसेंना बंगल्यासोबतच मंत्रिपदावर देखील पाणी सोडावं लागलं. 

दिपक केसरकरांना शालेय शिक्षणमंत्रिपद मिळालं.केसरकरांना रामटेक बंगला मिळाला. निवडणुकीत महायुती पुन्हा आली पण केसरकरांचं मंत्रिपद गेलं

असा इतिहास असणारा रामटेक बंगला आता बावनकुळेंऐवजी पंकजा मुंडेंना मिळणार अशी चर्चा असतांनाच अचानक बावनकुळेंचं कुटुंब  रामटेक बंगल्याची पहाणी करुन गेले..  यावेळी संकेत बावनकुळे आणि सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यात बंगल्याच्या नुतनीकरणाची चर्चाही झाली. त्यामुळे रंगरंगोटी आणि जुनं बांधकाम हटवल्यानंतर   बंगला चंद्रशेखर बावनकुळे स्विकारतायेत की पंकजा मुंडे हे पाहाणं महत्वाचं असेल.

राजकारण हा नॅरेटीव्हवर चालणारा खेळ आहे... इतर वेळी राजकिय नेते जनतेत सोयीस्कर नॅरेटीव्ह पोहोचवण्याचा खेळ खेळतच असतात... मात्र, सोबतच याच  राजकारण्यांमध्ये काही धारणांचा खेळही खेळला जातो.. रामटेकविषयी सुद्धा अश्याच धारणेचा खेळ गेल्या काही वर्षात बघायला मिळालाय.. त्यामुळे या रामटेकवर राहायला येणारा मंत्र्याचं यंदा राजकिय टेकऑफ होणार की इतिहासाची पुनरावृत्ती होत त्यांचं राजकिय विमान क्रॅश होणार.येणारा काळच सांगेल.