नाशिक : दिशा सालियन हिच्या मृत्यूला एक शिवसेनेचा नेता जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच, दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेली होती.
महापौर यांनी दिशाच्या आईवडिलांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दिशाच्या मृत्यूचे राजकारण थांबवा, आम्हाला जगू द्या अशी विनंती केली होती. तर, राज्य महिला आयोगाने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
या प्रकरणाचे वादळ शांत होत असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाशिकमध्ये आज पुन्हा शिवसेनेवर टीका केलीय. दिशा ही आईवडिलांसोबत रहात नव्हती. ज्याने तिच्यावर अत्याचार केले आहेत ते प्रकरण आम्ही बाहेर काढत आहोत.
तिला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उलट तिच्या वडिलांनी आमचे आभार मानले पाहिजेत. माझ्याकडे चोपडी तयार आहे. वेळ आल्यावर ती बाहेर काढेन, असा इशारा राणे यांनी शिवसेनेला दिलाय.
त्या जमिनी शिवसेना नेत्यांनी घेतल्या
नाणार येथील प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. मात्र, हा प्रकल्प होणार आहे. परंतु, येथे भूसंपादनासाठीच्या सर्व जमिनी शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्या आहेत. तेथील शेतकऱ्यांना शिवसेनेने फसविल्याचा आरोप त्यांनी केला.
राऊत यांची चांगली सुरवात...
पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला जात आहे. वाझे हे त्याचे उदाहरण आहे. अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे. संजय राऊत सगळ्या प्रकरणाची सुरवात चांगली करतात. पण, शेवट मी करणार आहे. त्याने इडीमध्ये माहिती दिली की मी माझ्याकडची माहिती देणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे आहेत. सरकार पाडायचे की पडेल. जे सोयीने होईल ते चालेल अशी त्यांची भूमिका आहे. राऊत याने मुलीच्या नावाने बेनामी व्यवहार केलेत. त्याला ईडीकडून अटक होणार असे राणे म्हणाले.