औरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक सय्यद मतीन विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला आहे. एका महिलेला नोकरी लावून देण्याचं तसंच लग्नाचं आमिष दाखवत त्याने अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रशीदपुरा इथं राहणारी एक महिला आधार कार्ड बनविण्यासाठी ती एक वर्षापूर्वी नगरसेवक सय्यद मतीनच्या कार्यालयात गेली होती. मतीनने तिला आधार कार्ड बनवून नोकरी मिळवून देतो, लग्न करतो असं आमिष दाखवून अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास त्याने ठार मारण्याचेही महिलेला धमकावले. त्यामुळे सुरुवातीला महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितलं नाही. मात्र मतीनकडून लग्नास नकार मिळाल्याने तिने पोलीस आयुक्तालयात मतीनविरुद्ध बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
औरंगाबादमधील वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन याधी देखील चर्चेत आला होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शोकसभेला विरोध केल्याने सय्यद मतीन भाजप नगरसेवकांनी मारहाण केली होती. त्यानंतर एमआयएमने देखील सय्यद मतीनची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर मतीनला सभागृहात येण्यात देखील बंदी घालण्यात आली आहे.