आंब्याला मोहोर आल्याने बागायतदार आनंदित

कोकणात परतीचा पाऊस गेला की नोव्हेंबरची थंडी सुरू होती आणि साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते...मात्र यावर्षी ऑक्टोबरच्या दुस-याच आठवड्यात आंबे मोहोरले आहेत. खास करून कातळावरील आंब्याची कलमे चांगली मोहोरली आहेत.. त्यामुळे आता आलेला मोहोर वाचवण्याचं आवाहन सध्या आंबा बागायतदारांसमोर आहे....

Updated: Nov 2, 2017, 08:57 PM IST
आंब्याला मोहोर आल्याने बागायतदार आनंदित  title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोकणात परतीचा पाऊस गेला की नोव्हेंबरची थंडी सुरू होती आणि साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते...मात्र यावर्षी ऑक्टोबरच्या दुस-याच आठवड्यात आंबे मोहोरले आहेत. खास करून कातळावरील आंब्याची कलमे चांगली मोहोरली आहेत.. त्यामुळे आता आलेला मोहोर वाचवण्याचं आवाहन सध्या आंबा बागायतदारांसमोर आहे....

कोकणातल्या खास करुन कातळावरच्या कलमांना ऑक्टोबरमध्येच मोहोर आल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आनंदित आहे... मात्र आलेला मोहोर टिकवणं हेच सर्वात मोठं आव्हान शेतक-यांसमोर आहे. कारण गेल्या 5 वर्षांत तुडतुडा, भुरी, बुरशी जन्य रोग आणि करपा रोगांचा परिणाम मोहोरवर होत होता. यावर उपाय म्हणून वेळेत फवारण्या करणं गरजेचं असल्याचं मत कृषी विभागानं व्यक्त केलंय. 

हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे फुलं येण्यासाठी 13 अंश सेल्सियस किंवा त्याहून कमी तापमान किमान 7 दिवस असणं आवश्यक आहे. सध्या कोकणात आंबा मोहोरसाठी आवश्यक वातावरण असल्यानं कलमं मोहोरली आहेत. परंतु भविष्यात वातावरणाची साथ मिळाली पाहिजे असंही बागायतदार सांगतायत. 

गेल्या काही वर्षांपासून कोकणातल्या हापूस आंब्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येतोय. त्याचा मोहोर वर्षे, फलधारणा, फळांची वाढ यावर परिणाम दिसून येतो. मात्र सध्या सकारात्मक परिस्थिती आहे... त्यामुळे आता आलेला मोहोर टिकवणं हेच खरं आव्हान असणारेय. तरंच आंब्याचं उत्पादन चांगलं होईल आणि पर्यायानं आंब्याला दरही चांगला मिळेल.