दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातील दहावीच्या विद्यार्थी पालकांसाठी महत्त्वाची बातमी... परीक्षा संपत नाही आणि निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत सरकारने घातलेला अकरावी प्रवेशाचा मोठा घोळ समोर आलाय. यंदा अकरावीच्या प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सोपी राहिलेली नाही. कारण अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाचा घोळ निर्माण झालाय. मराठा आणि सवर्ण आरक्षणामुळे अकरावी प्रवेशाचा कोटा १०३ टक्क्यांवर गेलाय.
- ओबीसी, एससी एनटी यांना ५२ टक्के घटनात्मक आरक्षण आहे
- मराठा आरक्षण १६ टक्के
- आर्थिक दुर्बल सवर्ण आरक्षण १० टक्के
- इनहाऊस कोटा २० टक्के
- व्यवस्थापन कोटा आरक्षण ५ टक्के
ही संपूर्ण टक्केवारी १०३ टक्के होते. त्यामुळं खुल्या गटातील एकही विद्यार्थ्यासाठी जागा उरत नाही. आरक्षणाचा हा पेच आता कसा सोडवायचा? असा प्रश्न शिक्षण तज्ज्ञांसमोर आहे. राजकीय फायद्यासाठी आरक्षणाची टक्केवारी वाढवून जनतेची फसवणूक केली जात असल्याची टीका तज्ज्ञांनी केलीय.
आरक्षणाचा हा पेच सोडवण्यासाठी आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा दहावीच्या निकालानंतर आरक्षणाच्या मुद्यावर धावाधाव करण्याची वेळ सरकारवर येईल.