रोहिणी खडसे यांचा 'हा' फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

 एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध लागल्याचे दिसत आहे.  

Updated: Oct 21, 2020, 08:30 PM IST
रोहिणी खडसे यांचा 'हा' फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल  title=
Pic Courtesy: Rohini Khadase @ Facebook

वाल्मिक जोशी / जळगाव : नाराज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचवेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध लागल्याचे दिसत आहे. तर खडसे यांच्या सूनबाई अर्थात भाजप खासदार रक्षा खडसे पक्षातच राहणार आहेत. 

एकीकडे खडसे राजीनाम्याची पत्रकार परिषद घेत असताना त्यांची कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी यांनी आपल्या फेसबुक पेजवर फोटो अपलोड करत होत्या. घड्याळ लावतानाचे हे फोटो अवघ्या काही मिनिटांत व्हायरल झाले. केवळ १५ मिनिटांमध्ये ४ हजार लाईक्स आणि साडेचारशे कॉमेंट्स पडल्या. खडसे यांच्यासोबत आपणही राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचं रोहिणी यांनी जाहीर केले आहे.  


भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. आता त्यांच्या कन्या रोहिणी याही राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणार आहेत. तसे त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यामातून न बोलता दाखवून दिले आहे. हाच त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. 

रोहिणी खडसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर नवा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या मनगटावरील घड्याळाकडे बघताना दिसतात. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचा फोटो ठेवत त्यांनी एकप्रकारे आपली पुढील राजकीय वाटचालच सांगितली आहे.

तसेच रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मीही भाजपला राजीनामा देऊन राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या वडिलांच्या नाराजीबाबत आपले मत व्यक्त केले. मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली.