Maharastra Politics : पिंपरी चिंचवडचा गुंड अविनाश बाळू धनवे याची इंदापूरमधील हॉटेलमध्ये (Indapur Murder case) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री मित्रांसोबत हॉटेलवर जेवायला थांबलेल्या गुंडावर आरोपींनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. एवढंच नाही तर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. गाडीवरून पंढरपूरला निघाले असताना इंदापूरच्या हॉटेलवर जेवणासाठी थांबले. त्यावेळी पाळत ठेवणाऱ्या हल्लेखोरांनी पाठीमागून येऊन खुर्चीवर बसलेल्या गुंडावर गोळ्या झाडल्या, मृत्यू झाल्याची खात्री नसल्याने हल्लेखोरांनी कोत्याने देखील वार केले. एकूण 8 ते 10 गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. इंदापूरात झालेल्या या घटनेवरून आता राजकीय वर्तुळात देखील प्रतिसाद उमटताना दिसत आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना बारामती मतदारसंघात येणाऱ्या इंदापूरमध्ये अशी घटना घडल्याने आता राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा लगावला आहे. गुन्हेगारांना भेटून बुके देत असतील तर गुन्हेगार मोकाट सुटणार नाहीत तर काय? अशी खोचक टीका रोहित पवारांनी (Rohit Pawar On Parth Pawar) नाव न घेता पार्थ पवारांवर केली.
काय म्हणाले रोहित पवार?
भरदिवसा हॉटेलमध्ये गुंडावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन खून करण्याचे कधीकाळी उत्तर भारतात सर्रास घडणारे गुन्हे आता कायद्याला धाब्यावर बसवून महाराष्ट्रातही (इंदापूर) घडताना दिसतायेत. राज्यकर्तेच गुन्हेगारांना ‘मोक्का’तून वाचवत असतील आणि काहीजण गुन्हेगारांना भेटून बुके देत असतील तर गुन्हेगार मोकाट सुटणार नाहीत तर काय? मग सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद देखील झाला होता. अजित पवार मुलाला पाठीशी घालतात का? असा सवाल विरोधकांनी विचारल्यावर अजितदादांनी नमती भूमिका घेतली होती. मात्र, अजित पवार यांनीच पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याची भेटली घेतल्याने राजकीय पक्ष गुन्हेगारांना पदरी का घेत आहेत? असा सवाल सामान्य जनता विचारत आहे.