मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. आता शिंदे आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिंदे सरकारचं आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासह खातेवाटपही झालं आहे, या खातेवाटपामध्ये भाजपचा वरचष्मा असलेला पाहायला मिळाल आहे.
अर्थ, गृह, जलसंपदा आणि उर्जा अशी महत्त्वाची खाती फडणवीसांकडे आहेत. याचाच धागा पकडत सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटातील आमदारांवर टीकेचे बाण सोडले आहेत.
नगर विकासचं मलिदा खातं सोडलं तर शिंदे गटाच्या हाती भाजपने भोपळाच दिला आहे. सगळी प्रमुख खाती फडणवीस आणि त्यांच्याच लोकांच्या मुठीत. त्यामुळे नाक मुठीत धरूनच ‘त्या’ 50 जणांना फडणवीसांकडे जावं लागेल, पण खोक्यांखाली स्वाभिमान चिरडून गेला असल्याने हे सर्व ते सहन करतील, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
50 जणांना ‘खोकी खोकी’ भरून मध तर आधीच मिळाला आहे पण नुसती मधात बोटे बुडवून आणि चाटून काय होणार?, आता मंत्रीपद हवेच. निदान महामंडळांचा बार तरी उडवाच नाही तर या क्रांतीचा फायदा नाही, असे शिंदे गटाचे लोक उघडपणे बोलू लागले. पुन्हा ही पहिल्या विस्तारानंतरची भानगड आहे. दुसऱ्या विस्तारानंतर शिंदेंच्या गावात व गटात रोज बारा भानगडींना तोंड फुटेल व प्रत्येक भानगडबाजास खोकीवाटप करताना केस दाढी गळून जाईल, असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.