दारु प्यायली, भावाला व्हिडीओ कॉल केला अन्... तरुणाच्या कृत्याने संभाजीनगर हादरलं!

Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये समोर आलेल्या या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे

Updated: Jan 30, 2023, 01:17 PM IST
दारु प्यायली, भावाला व्हिडीओ कॉल केला अन्... तरुणाच्या कृत्याने संभाजीनगर हादरलं! title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : मावस भावाला व्हिडिओ कॉल करत एका तरुणाने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये (sambhaji nagar) समोर आला आहे. या खळबळजनक घटनेचा व्हिडीओही (Video) समोर आला आहे. व्हिडीओ कॉल सुरु असतानाच तरुणाने गळफास (suicide) घेतला. त्यानंतर काही वेळातच त्याचा जीव गेला. नातेवाईकांनी त्याला रग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले.

संभाजीनगच्या मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडला आहे. अमोल उत्तम खाडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अमोलने मावस भावाला व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करत गळफास घेतला. मात्र अमोलने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला असून आत्महत्येचे कारण शोधले जात आहे.

अमोल हा व्यवसायाने रिक्षाचालक होता. अमोलचे साडेतीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षाची एक मुलगी आहे. पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरी गेली असल्याने तो एकटाच घरात राहत होता. दारु प्यायल्यानंतर अमोलने ज्योतीनगर भागात राहणाऱ्या मावस भावाला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलवर अमोलने आपण आत्महत्या करत असल्याचे मावस भावाला सांगितले. त्यानंतर आधीच गळफास लावलेल्या ठिकाणी अमोल गेला आणि त्याने आत्महत्या केली.

दरम्यान, अमोलच्या व्हिडीओ कॉलबाबत त्याच्या मावस भावाने इतर नातेवाईकांनी माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ अमोलच्या घराकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत अमोलने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला होता. अमोलला तातडीने रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.