सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांचा आता आई-वडिलांच्या स्थावर मालमत्तेत वारस नोंद न करण्याचा निर्णय मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायतीने घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर असा निर्णय घेणारी नरवाड ग्रामपंचायत ही सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी रोजी गावची ग्रामसभा पार पडली.ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या ग्रामसभेमध्ये नरवाड गावाने एकमताने ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. गावात राहणाऱ्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना आता त्यांच्या स्थावर संपत्तीच्या वारसा नोंद मधून बेदखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामसभेत या ठराव मान्यता देत, एक मताने सर्वच गावकऱ्यांनी याला मंजुरी दिली आहे.
याबाबत नरवाड ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार म्हणाले,'गावामध्ये काम करत असताना आपली मुलं आपल्याला सांभाळत नाही,अश्या तक्रारी अनेक आई-वडिलांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या.आई-वडिलांना घरातून बाहेर काढण्यासारखे प्रकार देखील घडले होते.त्याचबरोबर काही वृद्ध आई-वडिलांनी बाबत त्यांच्या मुले व सुनांकडून योग्य तो सांभाळ न करता टाळाटाळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. अशा या परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक पाऊल उचलण्याचा निर्धार करत आई-वडिलांचा सांभाळच मुलांकडून होणार नसेल, तर त्या आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांच्या वारसा कश्यासाठी हवा,या विचाराने जी मुलं आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणार नाही, त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या स्थावर मालमत्तेमध्ये वारसा नोंद घालता येणार नाही. तसेच त्यांना शासनाच्या ज्या काही लाभाच्या योजना आहेत,त्या मिळू शकणार नाही.तसेच रेशन धान्य दुकानांमधून देखील त्यांना धान्य न देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे ठरवलं आणि तसा ठराव ग्रामपंचायतीच्या 26 जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये सादर करण्यात आला.'
नेहमीप्रमाणे पार पडलेल्या ऑनलाईन सभेमध्ये एकमताने हा निर्णय मंजूर करण्यात आला.प्रत्यक्ष 140 आणि ऑनलाईन द्वारे 365 गावकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावली होती.आणि गावाने एक मुखाने 18 मंजूर देखील केला आहे, असं मारुती जमादार यांनी सांगितले आहे. तसेच एखाद्या मुला आई-वडिलांकडून मुलाचा सांभाळ होत नसेल आणि त्यांनी आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्यांच्या शेतजमिनी मधील देखील वारसा कमी करण्याबाबत तलाठीकडे शिफारस देखील ग्रामपंचायतचे माध्यमातून करण्यात येणार आहे,त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या आई वडीलांच्या सांभाळ करण्यामध्ये किमान सुधारणा होईल,तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या निर्णयाचं स्वागत सर्व स्तरातून करण्यात आल्याचं सरपंच मारुती जमादार यांनी सांगितले आहे.