Maharashtra Politics : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा (Infringement proposal) प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी असलेल्या राज्यसभेच्या (rajya sabha) अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता राज्यसभेत गेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यसभा संजय राऊत यांच्या हक्कभंग प्रस्तावावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्यानंतर संजय राऊत यांचीही खासदारकी जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
संजय राऊत यांच्या हक्कभंगावरील प्रस्तावाला 20 मार्च पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी खुलासा केला होता. याबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी माहिती दिली. सभागृहात बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंगाच्या आरोपावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या खुलास्यावर विचार केला. तो मला समाधानकारक वाटत नाही. हक्कभंग झाला या निर्णयापर्यंत मी आलो आहे, असे म्हटले होते. तसेच संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग संदर्भातील प्रकरण उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले.
संजय राऊत यांचा खुलासा योग्य वाटत नाही - नीलम गोऱ्हे
"संजय राऊत यांचा खुलासा विचारात घेवून संसदीय कार्यपद्धती अभ्यासली आहे. संजय राऊत यांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेण्याचे चुकीचे आहे. मला त्यांचा खुलासा योग्य वाटत नाही. ते राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांची हक्कभंगाची सूचना राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती यांच्याकडे पाठवला जाणार आहे," असे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी 1 मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यात माध्यमांसोबत बोलताना हे विधान केले होते. शिवसेनेच्या शिंदे गटावर टीका करताना त्यांनी विधिमंडळाचा चोरमंडळ म्हणून उल्लेख केला होता. "ही बनावट शिवसेना आहे. चोरांचं मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो," असे विधान संजय राऊत यांनी केले होते.