Raut vs Rane : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगलाय. निमित्त ठरलं ते नालायक शब्दांवरून तापलेलं वातावरण... केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या टीकेवर राऊतांनी शाब्दिक प्रहार केले. राणे आणि त्यांची नेपाळी मुलं खुलेआम शिव्या देतात, असा टोला राऊतांनी लगावला. राऊतांची ही टीका राणेंना चांगलीच झोंबली. परदेशात कोण कुणाला पप्पा म्हणतं, असा उलट सवाल नितेश राणेंनी केला. संजय राऊतांचं खासगी प्रकरण उघड करण्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला.
नारायण तातू राणे हे केंद्रात मंत्री आहे असं म्हणत त्यांना दोन नेपाळी मुलं आहेत, जे खुलेआम शिव्या देतात. तर राणे आणि त्यांच्या मुलांवर का कारवाई केली जात नाही? असा सवाल करत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरेंना अटक होणार, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नुकतंच केलं होतं. त्यावरूनही राणे विरुद्ध राऊत असा आमनासामना झाला होता. राऊत विरुद्ध राणे यांच्यातले हे वार-प्रहार उभा महाराष्ट्र दररोज पाहतो.
आदित्य ठाकरे कोण आहेत? त्याला मी गांभीर्याने घेत नाही. कोकणात येऊन बैठक घेतो. ही शिवसेनेची अधोगती नाही का? शिवसेना अधोगतीकडे चालली आहे. सभा नाही घेत आता बैठक घेतोय. जाहीर सभेला मैदान लागते. पण, आता त्याचे खळग झाले, असे राणे म्हणाले होते.
आणखी वाचा - Maharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात 'ना...लायक' राजकारण
दरम्यान, रोज सकाळी राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन टीका करायची आणि नितेश राणेंनी त्याचा खरपूस समाचार घ्यायचा, हे आता महाराष्ट्राच्या अंगवळणी पडलंय. यातून सामान्य जनतेला मिळत तर काहीच नाही. राजकीय हास्यजत्रा तेवढी पाहायला मिळते.