महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इन्कम टॅक्स छाप्यानंतर रामराजे निंबाळकरांचं 7 शब्दांचं Whatsapp स्टेटस चर्चेत

Sanjivraje Naik Nimbalkar Income Tax Raid: आयकर विभागाने केलेली छापेमारी पाच दिवस सुरु होती. या छापेमारीनंतर रामराजे निंबाळकरांनी ठेवलेलं स्टेटस चर्चेचा विषय ठरतंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 10, 2025, 01:31 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इन्कम टॅक्स छाप्यानंतर रामराजे निंबाळकरांचं 7 शब्दांचं Whatsapp स्टेटस चर्चेत title=
त्या स्टेटसची चर्चा

Sanjivraje Naik Nimbalkar Income Tax Raid: आयकर विभागाने मागील पाच दिवसांपासून साताऱ्यात केलेल्या छापेमारीमुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. फलटण येथे आयकर विभागाने संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सुरू केलेली चौकशी रविवारी पाचव्या दिवशी संपली. ही चौकशी संपल्यानंतर काही तासांमध्येच माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस मोठ्या राजकीय संघर्षाची चाहुल असल्याची चर्चा सातऱ्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. पण या स्टेटसमध्ये नेमकं आहे तरी काय ते पाहूयात...

पाच दिवस सुरु होता आयकर छापा

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं धाड टाकली. या धाडीमुळे फलटण शहरात एकच खळबळ उडाली. बुधवारी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी, पुण्यातील निवासस्थानी , 'गोविंद मिल्क डेअरी'वर चौकशीसाठी दाखल झाले होते. बुधवारपासून सुरु झालेली चौकशी पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी संपली. पाच दिवसापासून संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक देखील ठिय्या मांडून होते. संजीवराजे नाईक निंबाळकरांचं डेअरी उत्पादनांचा आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायसुद्धा आहे. या धाडीमुळे चर्चांना उधाण आलंय. सोबतच आयकर विभागाच्या छापेमारीला राजकीय कंगोरे असल्याचीही चर्चा रंगली होती. 

रामराजे निंबाळकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये काय?

राजकीय हेतूने ही छापेमारी करण्यात आल्याचं बोललं जात असतानाच आता ही छापेमारी संपल्यानंतर रामराजे निंबाळकरांनी सूचक विधान आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून केलं आहे. "सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच," असं अवघ्या सात शब्दांचं व्हॉट्सअप स्टेटस रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलं आहे. 

भरपूर प्रश्नांचा मारा

आयकर विभागाकडून या छापेमारीदरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकरांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्याचे समजते. फलटण येथील घरावरील छाप्यादरम्यान आयकर विभागाने संजीवराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्याजवळील अनेक कागदपात्रांची चौकशी करण्यात आली. चौकशीत काहीही सापडलं नसल्याची माहिती  संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. माझ्याकडून काहीही जप्त केलं नाही. ही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती. गोविंद मिल्क संदर्भात ही कारवाई होती असे देखील निंबाळकर यांनी सांगितले. या प्रकरणावरुन आता पलटणमधील राजकारण अधिक तापण्याचं चिन्ह दिसत आहे.