'मी CM झालो तेव्हा राज ठाकरेंनी...'; फडणवीसांनी सांगितलं घरी जाऊन भेटण्याचं खरं कारण

CM Fadnavis On Why He Visited Raj Thackeray At His Home: आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 10, 2025, 12:42 PM IST
'मी CM झालो तेव्हा राज ठाकरेंनी...'; फडणवीसांनी सांगितलं घरी जाऊन भेटण्याचं खरं कारण title=
फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

CM Fadnavis On Why He Visited Raj Thackeray At His Home: महाराष्ट्रातील राजकारणात काहीतरी नवं घडणार अशा चर्चांना उधाण आणण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या दादरमधील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन भेटल्यानंतर फडणवीसांनी भेटीबद्दल भाष्य केलं आहे. फडणवीस हे 'परीक्षा पे चर्चा'च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांसी चर्चा करताना फडणवीसांना त्यांनी कार्यक्रमाला येण्यापूर्वी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. भाजपा मनसेला साथ देणार का असा थेट सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज यांची भेट का घेतली आणि भेटीत काय घडलं याबद्दलची माहिती दिली.

...म्हणून भेटायला गेलो

'परीक्षा पे चर्चा'च्या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर फडणवीसांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यावेळेस एका पत्रकाराने, "तुम्ही आज सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मनसेला पुन्हा भाजपा साथ देतंय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत," असं म्हणत फडणवीसांना प्रश्न विचारला. या प्रश्नावर फडणवीसांनी, "चर्चा तुम्ही करता," असं म्हटलं. पुढे बोलताना राज ठाकरेंच्या भेटीसंदर्भात फडणवीसांनी, "ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना मी सांगितलं होतं की मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज त्यांच्या घरी गेलो होतो," असं सांगितलं.

भेटीदरम्यान काय केलं? फडणवीसांनी सांगितलं.

फडणवीस यांनी भेटीदरम्यान काय झालं याबद्दलची माहितीही दिली. "मी त्यांच्या (राज ठाकरेंच्या घरी) घरी ब्रेकफास्ट केला. गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. या बैठकीचा किंवा आमच्या गप्पांचा कुठलाही राजकीय संबंध नाही. केवळ मैत्री करता मी त्यांच्या घरी गेलो होतो," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> अमित ठाकरे आमदार होणारच? राज-फडणवीस भेटीनंतर 'या' फॉर्म्युल्याची चर्चा

पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंची आक्रमक भूमिका

काही दिवसांपूर्वीच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन आश्चर्य व्यक्त करताना भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा कशा मिळाल्या असा प्रश्न उपस्थित केला होता. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतान, "लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे मात्र ती मतं आपल्यापर्यंत आलेली नाहीत," असं म्हटलं होतं. पक्षाचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असं आवाहन केलं होत. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे ते आता भाजपाविरोधात भूमिका घेणार का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. मात्र आजच्या भेटीनंतर दोघांमधील राजकीय भूमिका आणि खासगी नातं वेगळं असल्याची चर्चा दोघांच्या समर्थकांमध्ये आहे.