'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला...'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut On CM Fadnavis Raj Thackeray Meeting: फडणवीस आणि राज ठाकरेंदरम्यान पाऊण तास चर्चा झाली. याच भेटीसंदर्भात विचारलं असता राऊतांनी लगावला खोचक टोला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 10, 2025, 10:53 AM IST
'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला...'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला title=
राऊतांनी भेटीवरुन लगावला टोला

Sanjay Raut On CM Fadnavis Raj Thackeray Meeting: राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं बहुमताचं सरकार सत्तेत आलेलं असून या सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथील 'शिवतीर्थ' येथील निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस सकाळी पावणे दहाच्या सुमारास पोहोचले. एकीकडे मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु होती. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी या भेटीसंदर्भात विचारलं असता त्यांनी आपल्या खास शैलीत खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. 

राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच मांडली भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये निकालाबद्दल भाष्य करताना एवढ्या मोठ्या मताधिक्याने सरकार कसं आलंं? असा प्रश्न उपस्थित केला. अजित पवारांच्या पक्षाला लोकसभेला एक जागा मिळालेली असताना विधानसभेला अचानक 41 जागा कशा निवडणून आल्या? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. राज ठाकरेंनी आपल्याला लोकांनी मतदान केलं पण ते आपल्यापर्यंत आलं नाही असं पदाधिकाऱ्यांना सांगतानाच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या पक्षाची कामं पोहोचवा असं आवाहन केलं.

राऊतांना विचारला प्रश्न, विधानसभेत सोबत घेण्याची भूमिका होती पण...

दरम्यान, एकीकडे राज ठाकरेंनी भाजपाबरोबरच्या मित्र पक्षावर निशाणा साधलेला असतानाच दुसरीकडे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला थेट त्यांच्या घरी गेले आहेत. या भेटीसंदर्भात वेगवेगळे तर्क मांडले जात असतानाच राऊत यांनाही ही भेट सुरु असतानाच प्रश्न विचारण्यात आला. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. विधानसभामध्ये त्यांना सोबत घेण्याची भूमिका होती पण ते आले नाहीत. आता त्यांची टीका आणि ही भेट याकडे तुम्ही कसे बघता?" असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला. 

राऊतांचा राज ठाकरेंना टोला

या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊतांनी, "मी काय बघणार? त्यात बघण्यासारखं काय आहे. राज ठाकरेंनी शिवाजीपार्कला कॅफे खोलेला आहे ऐवढंच मला माहिती आहे. तिथे लोक सातत्याने चहापाण्याला येत असतात. तो सगळ्यांसाठी खुला आहे. चांगली गोष्ट आहे. राजकारणात असं चहापान होत असतं. चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांना समोर नजारा पाहायला मिळतो. चांगली बसायला जागा मिळते उत्तम," असं उत्तर दिलं. उत्तर देऊन झाल्यानंतर ते मिश्कीलपणे हसले.