धक्कादायक खुलासा! वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असतानाही धनंजय मुंडेंनी...

Walmik Karad Dhananjay Munde Shocking Update: धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील जवळीकीवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच आता ही माहिती समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 9, 2025, 01:18 PM IST
धक्कादायक खुलासा! वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असतानाही धनंजय मुंडेंनी... title=
कराडवर एकूण 14 गुन्हे दाखल आहेत (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Walmik Karad Dhananjay Munde Shocking Update: विशाल करोळे / झी 24 तास प्रतिनिधी - बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात खंडणीसंदर्भातील गुन्ह्यामध्ये राज्यातील मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. 9 डिसेंबर रोजी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणामध्ये काही आठवडे फरार असलेला वाल्मिक कराड हा 31 डिसेंबर रोजी सीआयडीच्या पुण्यातील कार्यालयात शरण आलं. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची चौकशी सुरु असतानाच आता एक नवीन माहिती समोर आली आहे. अटक होण्यापूर्वी एकूण 14 गुन्हे दाखल असतानाही वाल्मिक कराडची शासकीय समितीवर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

शिंदे सरकारच्या महत्त्वकांशी योजनेचं महत्त्वाचं पद

बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून वाल्मिक कराडला शासकीय समितीवर घेण्यात आलं होतं. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशीसंबंधित काम वाल्मिक कराडला देण्यात आलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड होता. यासंदर्भात आजही वाल्मिक कराडच्या फेसबुक पेजवर उल्लेख आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुख प्रकरणाआधीच 14 गुन्हे दाखल असताना त्याला लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदावर कसं नियुक्त करण्यात आलं असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या ठिकाणीही करण्यात आलेली वाल्मिकीची नियुक्ती

धक्कादायक म्हणजे जिल्हा नियोजन समितीवरदेखील वाल्मिक कराड सदस्य होता. त्यामुळं इतके गुन्हे दाखल असलेले कराड याच्या समितीवर झालेल्या नियुक्त्यांबाबत आता संतोष देशमुख प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्यानंतर चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणामध्ये काही चौकशी होणार का हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे.

नक्की वाचा >> 40+ एकर जमीन, 8 घरं, 5 लाखांची गुरं अन् एकूण संपत्ती.. सुरेश धस किती श्रीमंत आहेत पाहिलं का?

व्हॉईस सॅम्पल घेणार

पवनचक्की चालवणाऱ्या कंपनीकडून वाल्मिक कराड यांनी खंडणी म्हणून 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड यांचे व्हॉइस सॅम्पल सीआयडीकडून घेतले जाणार आहेत. सदर प्रकरणामधील प्रमुख आरोपी असलेल्या विष्णू चाटेचा व्हॉईस सॅम्पल बुधवारीच घेण्यात आला आहे.

बीडमध्ये वाल्मिक कराड यांचा दबदबा

परळी नगर परिषदेचे माजी नरगाध्यक्ष असलेले वाल्मिक कराड हे पूर्वी गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक होते. त्यानंतर हळूहळू गोपीनाथ मुंडे यांच्यापासून दूर गेले. वाल्मिक कराड हे मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार स्वत: पाहत आहेत. धनंजय मुंडे मतदारसंघात नसतात तेव्हा त्यांच्या गैरहजेरीमध्ये परळीत वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतात असं स्थानिक सांगतात.