सातारा : शहीद सचिन संभाजी जाधव यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामधील दुसाळे या त्यांच्या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी जाधव कुटुंबीयांसह उपस्थितांनी साश्रुनयनांनी शहीद सचिन जाधव यांना अखेरचा निरोप दिला.
जाधव यांना भारत चीन सीमेवर लेह लडाख भागात वीरमरण आलं. १६ सप्टेंबरला कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले. सचिन 111 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कार्यरत होते. ते लेह-लडाखमध्ये देशसेवा बजावत असताना बुधवारी यांना वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सचिन जाधव यांना वीरमरण आल्याची बातमीनंतर जाधव कुटुंब आणि संपूर्ण दुसाळे गावावर शोककळा पसरली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शहीद सचिन जाधव यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं. त्यांच्या शौर्याला वंदन करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! जाधव कुटुंबीय आणि दुसाळे ग्रामस्थांच्या दुःखात महाराष्ट्रासह संपूर्ण देश सहभागी आहे. pic.twitter.com/axWRdqZ0N6
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 19, 2020