कोल्हापूर : राज्य सरकारनं घटना दुरुस्तीसाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फडणवीस सरकारला दिलायत. तसंच लोकशाहीत लोकांचं म्हणणं आपल्याला मिळालेल्या व्यासपीठावर मांडण्याची गरज आहे... आपल्याला मिळालेलं व्यासपीठ सोडून देणं योग्य नाही, असं म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारकीचा राजीनामा देणाऱ्यांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्यात.
यापूर्वी राज्य सरकार आरक्षणा संदर्भातील निर्णय घेतला होता परंतु, काही व्यक्ती कोर्टात गेल्या आणि हा निर्णय रद्द ठरवला... न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षणासंदर्भात मर्यादा आल्याय.. परंतु, कायदेशीर अडचणीलाही पर्याय आहेत... घटनेत थोडीशी दुरुस्ती केली तर आरक्षण देणं शक्य आहे, असं म्हणत पवारांनी आरक्षणाच्या मुख्य मुद्याला हात घातलाय. आरक्षण सरसकट दिले पाहिजे पण ते कोणी घेऊ नये, याबाबत काही निर्णय घेण्याची गरज आहे, अशी पुश्तीही त्यांनी जोडलीय.
इतकंच नाही तर, राज्य सरकारने पुढाकार घेवून घटना दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करावा मी विरोधकांना भेटून घटना दुरुस्तीची गरज काय आहे हे समजावून सांगायला तयार आहे, असा विश्वासही पवारांनी दिलाय.
सोबतच, मराठा समाज वारीत साप सोडणं अशक्य आहे... चिथावणीखोर वक्तव्य कोणी केली हे सरकारनं जाहीर करावं असंही शरद पवार यांनी म्हटलंय.
यावेळी राज्य सरकारवर टीका करत, मुख्यमंत्री आणि आणि राज्यकर्ते दिलेलं अश्वासन पूर्ण करतील अशी अपेक्षा होती... पण ते झालं नाही... धनगराना आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेवू असं सांगितलं होतं... तसंच १०० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देवू असं अश्वासन दिलं होतं, तेही त्यांनी पाळलं नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसंच मंत्र्यानी चुकीची वक्तव्ये केली म्हणून आंदोलनाला हिंसक वळण लागलं, असं टीकास्रही पवारांनी यावेळी सोडलंय.
काही गोष्टी देशवासियांना सांगायची गरज आहे... एखाद्या गोष्टीची नेमकी किंमत किती? हे जनतेला कळायला हवं असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलंय.