रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या आठवणीने शरद पवार भावूक झाल्याचे चित्र एका कार्यक्रमात पाहायला मिळाले. ते रविवारी तासगावमध्ये आर.आर.पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी आबांच्या आठवणी जागवल्या.
आबा तुम्ही तंबाखू सोडण्याचा, माझा सल्ला ऐकला नाही. जर ऐकलं असता, तर तुम्ही आज आमच्यात असता. आबा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने फार लहान होता. माझ्यासारख्या माणसाच्या अगोदर आबा का गेलात?, असे शरद पवार यांनी म्हटले.
कसाबला फाशी देताना केंद्रीय गृह खात्यामधील एका अधिकाऱ्याने मला सूचना दिली होती. कसाबला फाशी दिल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच हा निर्णय घेणाऱ्या गृहमंत्र्यांच्या जीवाला आयुष्यभर धोका असेल. मी आबांना याबाबत सांगितले होते. तेव्हा त्यांनी न डगमगता संपूर्ण परिस्थिती हाताळली, असे शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहित याचेही कौतुक केले. पुढच्या पाच वर्षांमध्ये राज्याला रोहितच्या रूपाने आबा पाहायला मिळतील. आबांच्या कुटुंबाला असेच प्रेम द्या, असे शरद पवार यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी २०२४ साली राष्ट्रवादी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांना उमेदवारी देईल, असेही जाहीर केले. २०१९ च्या निवडणुकीत सुमनताई आर आर पाटील आणि २०२४ मध्ये रोहित आर आर पाटील हे आमदार होतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.