"शिंदे - फडणवीस सरकार अनैतिक"; भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य

Shinde Fadnavis government : राज्यातील सत्तातरानंतर शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच भाजपच्या माजी खासदारानेच आता सरकारवर टीका केली आहे 

Updated: Dec 24, 2022, 03:19 PM IST
"शिंदे - फडणवीस सरकार अनैतिक"; भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य title=

Maharashtra Politics : शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांच्यासह 40 आमदार आणि 12 खासदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली. यानंतर शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट समोर आले आहेत. या फुटीनंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. यावरुन ठाकरे गटाकडून सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. हे सरकार असंवैधानिक असल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलीय. यानंतर आता भाजप खासदारानेही शिंदे - फडणवीस सरकार अनैतिक असल्याचे म्हटले आहे.

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी पंढरपुरात बोलताना सरकारवर टीका केली आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूर मध्ये आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद घेत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्राचे सरकार संवैधानिक पद्धतीने तयार करण्यात आले आहे का असा सवाल केला. त्यावेळी स्वामी यांनी, "हे सरकार पाडून तयार करण्यात आले आहे आणि ते अनैतिक आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे," असे म्हटले.

पंढरपूरमध्ये कॉरिडॉर विकसित करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या योजनेला विरोध सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध केला आहे. काशी विश्वनाथ प्रकल्पाच्या धर्तीवर विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराभोवती कॉरिडॉर बांधण्याचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. त्याच्याविरोधात स्वामी यांनी सरकारवर टीका केली आहे.

"ज्या मोठ्या मंदिरांकडून सरकारला पैसे मिळतात त्यांना मुक्त करत आहेत. सरकारकडून मंदिरे मुक्त झाल्यावर त्याची जबाबदारी कोण घेणार याकडे सर्वात आधी लक्ष द्यायला हवं. 1861 मध्ये ब्रिटीश सरकारने ही जबाबदारी घेतली आहे," असे स्वामी यांनी म्हटले आहे.

यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील भाजप सरकारवरही टीका केली आहे. "नोटबंदीचा कोणताही फायदा झाला नाही. मोदी माझे ऐकत नाहीत. ते हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये सर्व मंदिरे ताब्यात घेतली आहेत. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करतो आणि मोदी सरकार त्यानुसार चालत नाहीये. 370 बद्दल मीसुद्धा बोलत होतो. 370 कलम हटवण्यासाठी मी अमित शाह यांना मार्गदर्शन केले," असेही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.