Chagan Bhujbal News : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जीआरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. अशातच या वादाची ठिणगी आता मंत्रीमंडळात देखील पडली आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) ठाम आहेत. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणीची चर्चा होत असतानाच शिवसेनेच्या काही आमदारांनी मांडलेल्या भूमिकेमुळे छगन भुजबळ यांचे मत्री पद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी करण्याची मागणी केल्याची चर्चा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेवरून भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची आक्रमक मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलीय. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आव्हान गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय.
भुजबळांनी सरकारमध्ये राहून लढण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून लढावं असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. राजीनामा दिला नाही तर त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं समजावं असा आरोप देखील त्यांनी केला होता. तर, आपल्याला ओबीसी समाजाच्या हितापेक्षा काहीही महत्त्वाचं नसल्याचा दावा भुजबळांनी केला.
मराठा आरक्षणावरून अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी सरकारच्या विरोधातच आघाडी उघडलीय. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत सरकारच्या नव्या मसुद्यामुळं आरक्षणात नवे वाटेकरी तयार होतील, असा आक्षेप भुजबळांनी घेतलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीत मंत्री छगन भुजबळ एकाकी पडत असल्याचेही चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरेंनीही मराठा आरक्षणाचं समर्थन केले आहे. मराठा आरक्षणाचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न महायुतीच्या काळात मार्गी लागल्याबद्दल तटकरेंनी समाधान व्यक्त केले. मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांची भूमिका ही वैयक्तिक असून, पक्षाची नाही असं वक्तव्य करत प्रफुल्ल पटेल यांनी हात वर केले आहेत. भुजबळांनी देखील ही भूमिका आपलीच असल्याचं ठणकावून सांगितलंय. ही भूमिका माझीच आहे. कोणाला पटो ना पटो ओबीसींसाठी लढतोय आणि लढत राहणार असं स्पष्ट शब्दात भुजबळांनी ठणकावल आहे.