Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडलं आहे. आता पक्ष सावरण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे.
जिल्हाभरात ठिकठिकाणी फिरून शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संपर्क साधत आहेत. आज भिवंडीतून त्यांची ही शिवसंवाद यात्रा सुरु झाली. भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर, शिर्डीत त्यांची ही यात्रा असेल. सत्ता संघर्षानंतर आदित्य ठाकरे प्रथमच मुंबई बाहेर जात आहेत.
'हे सरकार लवकरच पडेल'
आज भिवंडीत शिवसैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात पुरपरिस्थिती आहे आणि अशा परिस्थितितही ते आम्हाल धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही अशी धमक्यांची दखल घेत नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. हे सरकार बेकायदेशीरपणे बनवलं गेलं असून मला खात्री आहे की हे सराकर पडेल, बंडखोर आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात यावं आणि जिंकून दाखवालं असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरे आजारी असताना बंड केलं
बंडखोरांना राज्यमंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. पण आम्हाला जे सोडून गेले ते शिवसैनिक नाही, ते गद्दारच आहेत, उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केलं अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांची पाठ फिरताच...
आदित्य ठाकरे यांच्या सभेला भिंवडीत शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. पण आदित्य ठाकरे यांची पाठ वळताच शिवसेनेला मोठा धक्का बसला. भिवंडी महापालिका मधील शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यांच्याबरोबर कांग्रेसचे नगरसेवकही शिंदे गटात जाणार आहेत. जवळपास 25 ते 30 नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, बदलापूर यानंतर आता भिंवडी महानगरपालिकेतील शिवसेनेचे जवळपास 25 ते 30 नगरसेवक हे शिंदे गटात जाणार आहेत.