मुंबई : निष्ठावंत शिवसैनिकांसाठी आनंददायी बातमी आहे. शिवसेना राज्यभरात १ लाख शाखाप्रमुखांची नेमणूक करणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील ग्रामीण भागातील युवक आणि युवकांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. शिवसेनेला ग्रामीण भागात वाढवण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्षबांधणीसाठी हा कार्यक्रम राबवण्याची गरज आहे, असे शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरुकर यांनी सांगितले.
'माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र' या अभियानांतर्गत शाखाप्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. शाखाप्रमुखांची नेमणूक करताना निष्ठावंत शिवसैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पुढील महिन्यातील म्हणजेच जुलैच्या २७ तारखेपर्यंत शाखाप्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे.
शाखाप्रमुखांची नेमणूक करण्याचा अधिकार विभागप्रमुखांना देण्यात आला आहे. ही नेमणूक करताना विभागप्रमुखांनी आपल्या नातेवाईंकांना संधी देऊ नये. तर त्याऐवजी पक्षासाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिवसैनिकांना प्राधान्य द्यावे, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ही माहिती शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी दिली.
राज्यातील ग्रामीण भागात शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वॉर्डमध्ये महिला आणि पुरुष शाखाप्रमुख नेमले जाणार आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक प्रभागात एका उपशाखाप्रमुखाची नेमणूक केली जाणार. नेमणूकीआधी त्या व्यक्तीकडून शिवसेना नोंदणी अर्ज भरुन घेतला जाणार आहे.
शाखाप्रमुख आणि शाखासंघटक या पदावर ज्यांची निवड केली जाणार आहे. त्या उमेदवारांचे अर्ज १-७ जुलैदरम्यान शिवसेना भवनावर पाठवण्यात येणार आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून याची माहिती देण्यात आली आहे.