मुंबई: नक्षलग्रस्त भागात मतदान करवून घेणे किती अवघड असतं, याचं वास्तवदर्शी चित्रण आपण बॉलिवूडच्या न्यूटन या चित्रपटातून पाहायला मिळालं होतं. मात्र, या चित्रपटात जे दाखवले गेले त्यापेक्षाही वस्तुस्थिती अधिक गंभीर आहे. मतदान ११ एप्रिलला असताना छत्तीसगडच्या बस्तरमधील मतदान यंत्रणा तीन दिवस आधीच कार्यान्वित झाली आहे. यासाठी २२ मतदान पथके बस्तर जिल्ह्यातल्या अतिसंवेदनशील केंद्रांकडे रवाना झाली आहेत. दोन दिवस ही पथके स्थानिक पोलीस छावण्यांमध्ये राहतील. ११ एप्रिलला मतदान प्रक्रिया राबवतील. नक्षल प्रभावित भागात मतदान यंत्रणा राबवण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर असते. छत्तीसगडच्या बस्तरमधील मतदानासाठी तीन दिवस अगोदरच कर्मचारी हेलिकॉप्टरने रवाना झालेत. नक्षल्यांच्या दहशतीच्या सावटाखाली मतदान करवून घेण्याचे शिवधनुष्य निवडणूक आयोगाला पेलायचे आहे.
एकूण ४० मतदान पथके हेलिकॉप्टरद्वारे पाठवली जाणार आहेत. दुर्गम आदिवासी भागात मतदान केंद्रे उभारणे आणि आदिवासींना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम या निवडणूक कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणारे हे कर्मचारी खरोखर लोकशाहीचेच दूत आहेत असे म्हणावे लागेल.