सांगली : जोरदार पाऊस कोसळत आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, असे असताना कृष्णा नदीच्या पात्रात पुन्हा स्टंटबाजी (Stunt) सुरू झाली आहे. आयुर्विन पुलावरून नदीत उंचावरून उडया मारल्या जात आहेत. सांगलीमधील (Sangli) एक तरुण पुलावरून उडी मारतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
मागील काही वर्षांपासून कृष्णेची पाणी पातळी वाढली, की आशा उड्या मारण्याचा प्रकार सुरू होत असतो. मात्र, पोलिसांनी अटकाव केल्यावर असे प्रकार बंद होतात. आता पुन्हा स्टंटबाजी दिसून आली आहे. कृष्णा नदीच्या पात्रात आयुर्विन पुलावरून नदीत उंचावरून उडया मारणे सुरु असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटापर्यंत आली आहे. त्यामुळे पाण्याचा धोका कायम आहे. असे असताना नदी पाण्यात उंचावरून उड्या मारणे सुरू झाले आहेत. त्यामुळे कोणताही अनर्थ घटना होण्याआधी पोलीस आणि प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.