Supriya Sule in baramati : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे बारामतीमध्ये तळ ठोकून राहणार आहेत. त्यांनी स्वत:च दौंड येथील सभेमध्ये याबाबत माहिती दिली. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्याचबरोबर ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? ताईंनी दादांचा धसका घेतलाय की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मी मराठी स्वाभिमानी स्त्री आहे. मी सत्ता आणि संघर्षा पैकी संघर्ष निवडला. संघर्षाच्या बाजूला वडील तर सत्तेच्या बाजूला अमित शहा होते. मी वडिलांची बाजू घेत संघर्ष निवडला. ज्या जन्मदात्यामुळे आपण आहोत त्याला कधीच विसरता येणार नाही, त्यामुळे मी संघर्ष निवडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे. इलेक्शन असू दे किंवा नसू दे.. आरोप प्रत्यारोप होतच राहतात. नवऱ्याला आणि मुलांना सांगितला आहे ऑक्टोबरपर्यंत आता सांभाळून घ्या. एप्रिलमध्ये लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे दहा महिने मी तुमच्यासोबतच आहे. मुलं मोठी झाली आहेत, मुलगी जबाबदारीने घर सांभाळते, आता त्यांना सांगितला आहे की भेटायचं असेल तर पुणे, इंदापूर नाहीतर बारामतीला यावं लागेल. मी काय आता दहा महिने मुंबईकडे येत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सुधीर मुनगंटीवार म्हणतात...
सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर आता राजकीय हल्ले सुरू झाले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला. कदाचित त्यांना धोका कळला असेल त्यामुळे 'जान बची तो लाखो पाये' आणि मतदारसंघात काही गडबड झाली तर लोक देशाचे नेतृत्व कसं करता येणार यामुळे सुप्रिया सुळे मतदारसंघात थांबणार आहेत, त्यांना आपल्या खूप शुभेच्छा आहेत, बारामतीची लोकसभेची निवडणूक आम्ही खूप कमी अंतराने जिंकू, असं विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
अमोल मिटकरींचा टोला
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याची धास्ती घेतली असल्यामुळे सुप्रिया सुळे यांना आता मुंबई सोडून बारामतीत तळ ठोकून बसण्याची वेळ आली आहे, असा टोला अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लागवलाय. तर यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांनाही सोबत टोला लगावला. अजित पवार यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळेच सुप्रिया सुळे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे अमोल कोल्हे निवडून येतात, अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केलीये.