अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : भारतात आता नवं देशी विमान तयार होणार आहे. हे विमान स्वस्त आणि मस्तही असणार आहे. मुख्य म्हणजे राहुरीच्या एका उद्योजकानं या विमान निर्मितीसाठी पुढाकार घेतलाय.भारतात नव्या विमानयुगाची नांदी झालीय. येत्या २ वर्षात भारतात देशी विमानं गगनभरारी घेताना दिसतील. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीचे उद्योगपती विजय सेठी आणि दक्षिण आफ्रिकेतील मायक्रो एव्हिएशन कंपनीनं मिळून पुण्यात विमान कारखाना उभारण्याच्या करारावर सह्या केल्या.
या करारानुसार येत्या २ वर्षात पुण्यातल्या प्रकल्पात २०० विमानांची जुळणी करण्यात येणार आहे. ही छोटी विमानं बहुद्देशीय असणार आहेत. ७० ते ८० मीटरच्या धावपट्टीवर ती टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतील. लष्कर आणि पोलिसांना बचावकार्यात ही विमानं उपयुक्त ठरतील. गस्तीच्या कामातही या विमानांचा वापर होईल.
शेतात किटकनाशक फवारणीतही या विमानाचा वापर शक्य आहे. शिवाय दोन माणसांच्या प्रवासासाठीही हे विमान खूपच उपयोगी ठरणार आहे. मुख्य म्हणजे विमानात १६ लिटर साधं पेट्रोल भरून तुम्ही तासभर उड्डाण करू शकता. या विमानाची किंमत ४५ लाखांच्या घरात आहे. ही किंमत ऑडी, जग्वार आणि मर्सिडीजपेक्षा कमी आहे.
त्यामुळं भारतातील नवश्रीमंतांना पंख लागतील यात शंका नाही. मेक इन इंडिया अंतर्गत हा विमान निर्मिती प्रकल्प आकार घेत आहे. यापूर्वी अमोल यादव यांनी देशी विमान निर्मितीचा प्रकल्प साकारण्याचा प्रयत्न केला. तो वैफल्यतेच्या मार्गावर गेला. हाच अनुभव या नव्या प्रकल्पाला येऊ नये हिच अपेक्षा.