TET Scam : शिक्षक भरती घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. टीईटी परीक्षेच्या अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. उजमा, हुमा, हीना अशी मुलींची नावं आहेत. तर अमीर सत्तार असं मुलाचं नाव आहे.
या चारही जणांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द झालंय. 'पण, माझ्या मुलानं परीक्षा दिलीच नाही मग अपात्र यादीच नावच आलं कसं?' असा सवाल उपस्थित केला आहे. तर मुली परीक्षेत नापास झाल्या होत्या, आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं सत्तारांनी म्हटलंय.
मात्र आता टीईटी घोटाळ्यात नाव आलेल्या सत्तार यांच्या मुलीला 2017 पासून तर आजतागायात पगार मिळत असल्याचा सुद्धा धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख यांना टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून पगार सुरु आहे.
याबाबत शाळेने वेतन बिल सादर केलं असून त्यामध्ये हीना कौसर अब्दुल सत्तार शेख पूर्णतः पात्र असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे त्यांना पगार सुरू असल्याचा खुलासा यावेळी शिक्षण विभागाने केला. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात असेही शिक्षण विभाग सांगितले आहे.
अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण
हे प्रकरण समोर आल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं. 'मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं' अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. 'आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी' असंही सत्तारांनी म्हटलं आहे
नेमकं प्रकरण काय?
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या घोटाळ्यातील 7880 उमेदवारांची यादी समोर आली. परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये हिना अब्दुल सत्तार आणि उझमा अब्दुल सत्तार या माजी राज्यमंत्र्यांच्या मुलींचीही नावं समोर आली.
उजमा आणि हिना यांनी यासाठी कुठल्या व्यक्तीला पैसे दिले हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत.
अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.