Thane-Borivali Twin Tunnel: घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे-बोरीवली ट्विन टनल प्रकल्पाला वनक्षेत्राची 35.5644 हेक्टर जमीन संपादित करण्याची मंजुरी मिळाली आहे. ठाण्याहून उपनगराचे अंतर दूर करणारा हा प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी 35.5644 हेक्टर जमीन वन विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सोपवण्यात आली आहे. यात ठाण्याकडील सात गाव आणि बोरीवलीकडील एक गावांची जमीन सहभागी आहे.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याकडील मानपाडा, माजीवाडा, बोरीवडे, येऊर आणि चेने गावाची जमीन यात संपादनासाठी वापरण्यात येणार आहे. तर, बोरीवलीच्या दिशेने मागाठाणे गावाच्या जमिनीवर प्रकल्पाचे काम सुरू आहे. दुहेरी बोगद्यांतर्गंत 1.85 किमी लांबीचा मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. एमएमआरएच्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी 14,401 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. तर, राज्य सरकारकडून 1,144.60 कोटी रुपये आणि केंद्र सरकारकडून 572.30 कोटी रुपये आणि जमीन संपादित करण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
दुहेरी बोगदा प्रकल्प हा संजय गांधी नॅशनल पार्कच्या पोटातून जाणार आहे. या बोगद्यासाठी बोरिंग मशीन (टीबीएम)चा वापर करुन 3-3 लेनचे दोन बोगदे खोदण्यात येणार आहेत. या बोगद्याचा वापर करुन वेस्टन एक्सप्रेस हायवे थेट ठाण्याच्या ईस्टन एक्स्प्रेस हायवेला कनेक्ट होणार आहे. बोगद्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बोरीवली ते ठाणे दरम्यान 5.75 किमी लांबीचा बोगदा आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते बोरीवली दरम्यान 6.5 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात वेंटिलेशन सिस्टिमसह अन्य उपकरणांचे काम हाती घेण्यात येणार आहे. एमएमआरडीए येत्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घोडबंदर रोडवरुन फक्त 15 ते 20 मिनिटांत ठाण्याहून बोरीवलीपर्यंत पोहोचता येणार आहे. आता हे अंतर पार करण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. तसंच, जर महामार्गावर एखादा अपघात झाला तर वाहतुक कोंडीत तासनतास अडकून पडायला होतं.