नाशिक : नाशिक शहरात गेल्या दोन महिन्यापासून चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. पोलिसांना चोरांनी चांगलेच चकवीत कोट्यावधींची लूट केली आहे. आता मात्र थेट नाशिक शहरात मध्यवस्तीत असलेल्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातच चोरी झाली आहे. या बंगल्यातून चंदनाची तीन झाडे तोडून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बंगल्यात दिवस रात्र सुरक्षा यंत्रणा तैनात असताना चोरट्यांनी दहा वर्षांची एक फूट व्यासाची झाडे अलगद चोरून नेल्याच्या प्रकार उघडकी आला आहे. या परिसरात सर्व पोलीस अधिकारी राहतात. या परिसराला पोलीस मुख्यालयाचा कडेकोट बंदोबस्तही आहे. असे असूनही पोलिसांना मात्र चोरट्यांच्या कृत्याचा आणि चोरट्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही.
या घटनेने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. ही घटना पाच जूनला रात्री घडली. तीन दिवस उलटूनही या प्रकरणाचा कोणताही तपास लागलेला नाही. अखेर शहर पोलिसांच्या सरकारवाडा पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शहरात नागरिकांसोबत पोलीस वसाहतही सुरक्षित नसल्याची भावना शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.