दोन वर्षांपासून तळीयेतील गावकरी कंटेनरमध्येच; घरांचे बांधकाम अद्यापही अपूर्णच

Taliye Landslide : इरसालवाडीतील दुर्घटनेनं 2021 साली झालेल्या तळिये दरड घटनेची आठवण करुन दिली आहे. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेत 87 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या दरडग्रस्तांची आजही परवड सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्षे तळियेतील गावकऱ्यांवर ऊन, वारा पाऊस झेलत कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 22, 2023, 11:58 AM IST
दोन वर्षांपासून तळीयेतील गावकरी कंटेनरमध्येच; घरांचे बांधकाम अद्यापही अपूर्णच title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगडच्या (Raigad News) इरसालवाडीत (irshalwadi landslide) दरड कोसळ्याच्या घटनेनं सर्वानाच हादरवून सोडलं आहे. आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून 22 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. भरपावसात बचावकार्य सुरु असून घटनास्थळी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने बचाव पथकाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांची तात्पुतरती व्यवस्था कंटेनरमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी (CM Ekant Shinde) दिली आहे. तसेच बचावलेल्यांचे पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या तळीये (taliye landslide) घटनेतील पीडितांना अद्याप पक्क घर मिळालेलं नाही. 

आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी जुलै 2021 मध्ये महाड तालुक्यातील तळीये गावच्या कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली होती. या दुर्घटनेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. 87 निष्पाप ग्रामस्थांचा जीव घेणाऱ्या या दरड दुर्घटनेमध्ये तळीये गावच्या कोंडाळकर वाडीवरील 66 घरे डोंगरातून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्या खाली गाडली गेली होती. या दरड दुर्घटनेतुन वाचलेल्या पीडितांची आजही परवड थांबलेली नाही. शासनामार्फत या ठिकाणी घर बांधण्याचे काम केल जात आहे. मात्र ते अद्याप अपूर्णच असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. यामुळे ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत शासनाने दिलेल्या तात्पुरत्या निवारा शेडमध्ये म्हणजे कंटेनरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हे पीडित राहत आहेत. त्यातत काही दिवसा शासनाने बांधलेल्या एका घराचा पाया ढासळल्याची घटना समोर आली होती. यामुळे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे दरडग्रस्तांची परवड कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रायगडच्या महाड येथील तळीये कोंढाळकरवाडी येथे 22 जुलै 2021 रोजी दरड कोसळून 87 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत कोंढाळकरवाडीतील 66 घरे उद्ध्वस्त झाली होती. या दुर्घटनेनंतर 66 कुटुंबांचे स्थलांतर कंटेनरमध्ये करण्यात आले. या कुटुंबांसाठी सरकारतर्फे पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आला होता. बाधित कुटुंबांना सहा महिन्यांत घरांचा ताबा देण्यात येईल, असा दावा तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी केला होता. मात्र या प्रकल्पातील काही घरांचे काम अद्यापही बाकी असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, दोन वर्षानंतरही तळीये गावच्या लोकांसाठी नवीन वसाहत बांधण्याचे काम सुरुच आहे. अद्यापही कोणीही या नवीन वसाहतीमध्ये वास्तव्यास गेलेले नाही. आम्ही आमची माणसं गमावली. त्यांच्यासोबत सर्व काही गेलं. त्यामुळे आता आम्हाला सरकारकडून फार काही अपेक्षा नाही. पण मागे राहिलेले लोकांसाठी मिळणारी घरे व्यवस्थित असावी अशीच माफक अपेक्षा आहे, असे पीडितांचे म्हणणे आहे.