माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया : बातमी गोंदियामध्ये पार पडलेल्या एका वेगळ्या नामकरण सोहळ्याची... जन्मपत्रिकेनुसार अथवा कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार बाळाचं नाव ठेवण्याची परंपरा आहे. मात्र गोंदियामध्ये मतदान करून नामकरण करण्यात आलय... गोंदियातील बंग परिवाराने त्यांच्या मुलाच्या नामकरणाकरिता चक्क बॅलेट पेपरचा वापर केलाय.
बॅलेट पेपर चा वापर करीत मोठ्या उत्साहात मतदान करणारे मतदाते पाहून, भंडारा जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुका नुकत्याच आटोपल्या आहेत. तर मग आता ही कुठली निवडणूक असा प्रश्न आपणास पडू शकेल. पण, मंडळी ही प्रक्रिया आहे, देवरी येथील बंग परिवारात नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाचा नामकरण सोहळ्याची, भारतीय समाजात कुंडलीनुसार नाव ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसारच या बालकाचे यक्ष, युवान व यौवीक ही तीन नावे सुचविण्यात आली होती. मात्र, यापैकी एका नावाला पसंती मतदानाचा प्रक्रियेतून मिळावी अशी बंग परिवाराची इच्छा होती. त्यामुळे नामकरण सोहळ्याला चक्क मतदान केंद्राचे स्वरूप देत बॅलेट पेपर चा वापर करीत मतदान घेण्यात आले.
या नामकरण सोहळ्यात झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण १४९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत ९२ मतदारांनी यूवान या नावावर शिक्कामोर्तब केले. एकंदरीतच बंग परिवारातर्फे आयोजित या आगळ्या वेगळ्या, नामकरण सोहळ्याला मतदारांनी मतदान करीत आपली चांगली उपस्थिती दर्शविली. एका बालकाचा नामकरण करीता चक्क मतदानाचा वापर करण्याची ही बहूदा पहिली वेळ असावी.