Vasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू

Vasant More Press Conference :  राजीनामा दिल्यानंतर (MNS Resignation) वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.

सौरभ तळेकर | Updated: Mar 12, 2024, 03:01 PM IST
Vasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू title=
Vasant More Emotional In Press Conference

Vasant More On MNS Resignation : पुण्यातील धडाकीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आज मनसेच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसेला (Pune MNS) जय महाराष्ट्र केला. पक्ष वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत आहे. पण अलीकडच्या काळात पूणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनायी आहेत, असं खंत व्यक्त करत वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला. अशातच राजीनाम्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद (Vasant More Press Conference) घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.

काय म्हणाले वसंत मोरे?

गेल्या दीड वर्षापासून मी लोकसभेची निवडणूक लढवण्याची उच्छूक आहे. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून इच्छुकांची संख्या वाढत गेली. राज ठाकरे यांच्यापर्यंत नकारात्मक अहवाल सादर केला गेला. काही पक्षातील लोकांनी जाणूनबुजून नकारात्म अहवाल पाठवले. राज ठाकरे यांच्याकडे चुकीची माहिती गेली. माझ्यावर वेळोवेळी अन्याय होतो, मी माझ्या आयुष्यातील ज्या लोकांसोबत, ज्या पदाधिकाऱ्यांसोबत 15 वर्ष घालवली. त्याच लोकांनी म्हटलं की वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे. मनसेने पुण्यात निवडणूक लढवली नाही पाहिजे, असं राज ठाकरे यांच्यापर्यंत सांगण्यात आलं. मी आता परतीचे दोर कापले आहे, असं म्हणताच वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

माझ्या साथीदारांवर चुकीच्या कारवाया होत असतील, तर मी का रहावं? राज ठाकरे यांच्याकडे मी वेळ मागितला. माझा वाद राज ठाकरे यांच्यासोबत नव्हता. पण चुकीच्या लोकांकडे शहर दिलं गेलंय. परंतू राज ठाकरे मला यासंदर्भात बोलले नाहीत. मला रात्रभर झोपलो नाही. निवडणूक लढवणं हा माझा गुन्हा आहे का? असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला. 

वसंत मोरे यांचं पत्र

वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहित आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याची मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत आहे. पण अलीकडच्या काळात पूणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनायी आहेत. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचं तंत्र अवलंबलं जात आहे, म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे, असं वसंत मोरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.