NCP MP Supriya Sule : आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो, महिला पत्रकारासोबत बोलताना ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नवा वाद उफाळून आला होता. महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले होते. यावेळी बोलताना प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही असंही संभाजी भिडे यांनी म्हटले होते. संभाजी भिडे यांच्या विधाननंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली तर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांनी केलेल वक्तव्य योग्य असल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कवितेच्या माध्यमातून संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
नेहमीच कुंकू लावयाचे छान दिसता
साने गुरुजी ते भिडे गुरुजी महाराष्ट्राचा प्रवास अशा आशयाची कविता सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केली होती. त्यानंतर आता कुंकवामुळे सुप्रिया सुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आपल्या मतदसंघात पोहोचलेल्या सुप्रिया सुळे यांनी एका वैधव्य आलेल्या महिलेला कुंकू लावलं आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली.
सुप्रिया सुळे यांनी भीमा पाटस साखर कारखान्याचे माजी संचालक व वरवंड गावचे माजी सरपंच रामदास जनार्दन दिवेकर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मीनाताई यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मीनाताई दिवेकर यांना कुंकू लावले. त्यानंतर इतरही स्त्रियांनी पुढे येत मीनाताई यांना कुंकू लावले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आता नेहमीच कुंकू लावयाचे छान दिसता असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी त्यांचा निरोप घेतला.
चांगला विचार रुजत आहे
यानंतर सुप्रिया सुळे यांनी याचा एक व्हिडीओसुद्धा ट्विटरवर पोस्ट केला आहे. "महाराष्ट्रातील जनता नेहमीच प्रागतिक विचारांचा पुरस्कार करते. बारामती लोकसभा मतदारसंघातील वरवंड येथील ज्येष्ठ नेते रामदासनाना दिवेकर यांच्या निधनानंतर आज त्यांच्या पत्नी मीनाताई दिवेकर व कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली त्यावेळी मीनाताईंना कुंकु लावले. त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी याचे स्वागत करुन मीनाताईंना कुंकु लावले. चांगला विचार हळूहळू रुजत आहे याचे समाधान आहे," असे सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनता नेहमीच प्रागतिक विचारांचा पुरस्कार करते. बारामती लोकसभा मतदारसंघातील वरवंड येथील ज्येष्ठ नेते रामदासनाना दिवेकर यांच्या निधनानंतर आज त्यांच्या पत्नी मीनाताई दिवेकर व कुटुंबियांंची सांत्वन भेट घेतली त्यावेळी मीनाताईंना कुंकु लावले. pic.twitter.com/3uZEHcFlJO
— Supriya Sule (@supriya_sule) December 27, 2022
साडीवरुन सुप्रिया सुळेंवर टीका
संभाजी भिडे यांच्या विधानावरुन प्रतिक्रिया दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर साडी नेसण्यावरुन टीका करण्यात आली होती. एका कार्यक्रमाच्या दरम्यान, महिला पत्रकार साडी का नेसत नाही? अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ ट्विट करत 'टिकली'वर टीका करणारे 'साडी'वर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या! असे म्हटले होते. त्यामुळे सुप्रिया सुळे साडीवरुनही विरोधकांच्या निशाण्यावरुन आल्या होत्या.