मुंबई : 'मेधा खोले या उच्चशिक्षित आहेत... शास्त्रज्ञ आहेत... मला वाटत होतं बायका शिकल्या की स्वतंत्र विचार करायला शिकतील... पण, या प्रकरणानं हा विचार खोटा ठरवला' अशी निराशाजनक प्रतिक्रिया व्यक्त केलीय ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी...
'स्त्रियांना माणसारखं जगणं जगता येत नाही म्हणून महात्मा फुलेंनी शाळा काढली होती... अत्युच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य बाळगण्याचा अधिकार आहेच... परंतु, या सोवळ्या ओवळ्याला किती महत्त्व द्यावं हे मेधा खोले यांच्यासारख्या स्त्रियांनी विचार करावं... विज्ञाननिष्ठेचा भाग सुशिक्षित वर्गाकडून अपेक्षित आहे...' असं विद्या बाळ यांनी म्हटलंय.
हा केवळ धार्मिक भावनेचा किंवा फसवणुकीचा भाग नाही तर सामाजिक प्रश्न असल्याचं सांगताना 'हे केवळ फसवणुकीचं प्रकरण यासाठी ठरत नाही कारण या घटनेला सामाजिक आयाम मोठे आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे खोले यांना 'सुवासिनी' बाईच स्वयंपाकासाठी हवी होती, असंही समोर येतंय. मला यात पुरुषसत्ताक व्यवस्थेचाच पगडा दिसतोय. धार्मिक पौरोहित्यात पुरुषाला त्याचा विवाह झालाय की नाही हे विचारलं जात नाही. परंतु, बाईला विचारलं जातं. पण, एक व्यक्ती म्हणून वाटतं की बाईचं स्थान हे तिच्या कर्तव्यावरून ठरवलं जावं... ती विवाहीत / अविवाहीत / विधवा / परितक्त्या आहे की नाही यावरून नाही...' असं विद्याताईंनी म्हटलंय.