कल्याण : सोशल मीडियामुळे लोकं एकमेकांशी कनेक्ट झाली. मात्र याच्या अतिवापरामुळे नात्यावरही मोठा परिणाम होऊ लागलाय. अनेकदा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नाती तुटल्याचे हल्ली ऐकू येते. अशीच एक घटना कल्याणच्या तिसगावात घडली. सतत चॅटिंग करण्याला विरोध केल्याने पत्नीनेच पतीला मारण्याची सुपारी दिल्याची घटना समोर आलीये. या पत्नीने तब्बल ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. कल्याणच्या पूर्व भागात राहणारे शंकर गायकवाड ३० मे पासून बेपत्ता होते.
याप्रकरणी शंकरच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तपासादरम्यान त्यांचा खून झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी अधिक तपास करताना त्यांच्या पत्नीने ३० लाखांची सुपारी देत त्यांचा खून केल्याचे उघड झाले.
शंकर आणि त्याच्या पत्नीमध्ये चॅटिंगवरुन नेहमीच वादविवाद होत असत. शंकरची हत्या झाली तेव्हा त्याची पत्नी देवाच्या दर्शनाला गेली होती. पोलिसांनी तपासादरम्यान तिला चौकशीसाठी बोलावले असता तिने या गुन्ह्याची कबुली दिली. तिने आपल्या पतीच्या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यासाठी तिने संबंधित व्यक्तीला ४ लाख रुपये दिले होते.