Cricketer Death In Nashik : क्रिकेट खेळणारा प्रत्येकजण सामना जिंकण्याची इच्छा मनात ठेवूनच मैदानात उतरतात. क्रिकेट सामना सुरु असताना एक खेळाडू आयुष्याची मॅच हरला आहे. बॉलिंग करताना एका तरुणाचा मृत्यू (Cricketer Death) झाला आहे. नाशिकमध्ये (Nashik ) ही घटना घडली आहे. मृत्यू कुणाला कधी आणि कुठे गाठेल हे दखील सांगता येवू शकत नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आकाश रवींद्र वाटेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश अवघा 32 वर्षांचा आहे. क्रिकेट खेळत असताना आकाशला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला तात्काळ त्यांच्या मित्रांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हृदय विकाराच्या झटक्यानं आकाशचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.
नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एनबीटी महाविद्यालयात क्रिकेटचे सामने सुरु असताना आकाशचा मृत्यू झाला. आकाश हा लॉ कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता. आकाश अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला होता. मॅच दरम्यान तो मैदानावर बॉलिंग करत होता. त्यावेळी त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागले. बॉलिंग करत असतानाच आकाश खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला. यामुळे मैदानावर एकच खळबळ उडाली.
आकाशच्या मित्रांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आकाशचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्यामुळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आकाशच्या मृत्युमुळे त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. तर, त्याच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.