Beed Guardian Minister: बीडमधील केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे बीडमधील आमदार सुरेश धस यांच्याकडून होताना दिसत आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांपासून ते मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेचं थेट नाव घेत हल्लाबोल करणाऱ्या सुरेश धस यांनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट' या विशेष मुलाखतीमध्ये बीडच्या पालमंत्रिपदावरुन एक विशेष मागणी केली आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही पालकमंत्रिपदावर निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर धस यांना 'टू द पॉइण्ट'मध्ये पालकमंत्रिपदावरुन प्रश्न विचारण्यात आला. पंकजा मुंडे पालकमंत्री झालेल्या चालेल का? असा प्रश्न सुरेश धस यांना विचारण्यात आला. "नाही, आम्ही पालकमंत्रिपद सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस, अजितदादा किंवा एकनाथ शिंदे या तिघांपैकी एक पालकमंत्री पाहिजे आम्हाला," असं उत्तर धस यांनी दिलं.
धनंजय मुंडे नको आणि पंकजा मुंडेही नको? असा प्रश्न विचारला असताना धस यांनी, "पंकजाताईंनी माझ्याविरोधात काम केलेलं आहे. त्या काय मला न्याय देणार उद्या? त्यांचे शिट्टीवाले लोक संभाळत बसतील. मग मी कशाला राजकारणात राहील? माझ्यामागे ज्या लोकांनी मतदान दिलेलं आहे त्यांची कामं नाही झाली तर लोक जोड्यानं मारतील ना मला लोक! पंकजाताई येणार शिट्टीवाल्याच्या घरी जाणार, त्यांची कामं करणार. म्हणजे परत कमळाचं चिन्ह, कमळाची बाग पंकजाताईंना फुलवायची आहे की शिट्टीची बाग फुलवायची ते पक्षानं ठरवावं ना, आम्ही कोण ठरवणार?" असा प्रतिप्रश्न केला.
नक्की वाचा >> ...तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही; अजित पवारांची भूमिका? रात्री अचानक CM भेटीनंतर...
बीड जिल्ह्यातील सध्याचे वातावरण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर राज्यभर संतापाची लाट आहे. यातही मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये, असा सर्वपक्षीयांनी आग्रह धरला आहे. त्यामुळेच बीडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बीडचे पालकमंत्री पद घ्यावे, असाही आग्रह धरण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सागर बंगल्यांवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली असून या भेटीत पालकमंत्रीपदाबाबत अंतिम चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, बीड प्रकरणावरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.