BJP Candidate List : भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, संभाजीनगर मतदारसंघातून 3 जणांना संधी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 20, 2024, 05:48 PM IST
BJP Candidate List : भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, संभाजीनगर मतदारसंघातून 3 जणांना संधी title=

BJP Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीये. तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांच्या घरातही उमेदवारी देण्यात आलीये.

अशातच संभाजीनगर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 3 नावांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अनुराधाताई अतुल चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून अतुल सावे यांन उमेदवारी जाहीर झाली आहे. तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

प्रशांत बंब 

गंगापूर विधानसभा मतदारसंघ 111 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.  विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून या मतदार संघासाठी प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये शेंदुरवाडा, वाळुज, हरसूल, तुर्काबाद, गंगापूर ही महसूल मंडळे आणि गंगापूर नगरपालिका आणि खुलताबाद तालुका यांचा समावेश आहे. 

अतुल सावे

संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल सावे आहेत. त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. जनतेच्या कल्याणासाठी आपल्या पदाचा खंबीरपणे उपयोग करून घेत त्यांनी सुमारे 2000 कोटींहून अधिक निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणला. म्हणूनच केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एक खंबीर नेतृत्व म्हणून अतुल सावे यांचे नाव पुढे येते. 

अनुराधाताई अतुल चव्हाण 

फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अनुराधाताई अतुल चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फुलंब्री विधानसभा जागा महाराष्ट्रातील एक महत्त्वाची जागा आहे. जिथे भारतीय जनता पक्षाने 2019 मध्ये विजय मिळवला होता. मात्र, यावेळी फुलंब्री विधानसभेचा निकाल कोणत्या पक्षाच्या बाजूने लागणार हे जनता ठरवणार आहे.