डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतल्या खड्ड्यांपासून आपल्या जीवाला धोका असून त्यापासून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी अजब मागणी एका तरुणाने पोलिसांकडे केली आहे. कल्याणमधल्या शिवाजी चौकात मागल्या महिनाभरात झालेल्या दोन अपघातांनंतर नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. रस्त्यावरील वेड्यावाकड्या पेव्हर ब्लॉकमुळे हे दोन्ही अपघात झाले होते. यामध्ये एका लहान मुलाचा आणि महिलेचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर चिराग हरिया या तरुणाने आपल्या जीवाला कल्याण-डोंबिवलीतल्या खराब रस्त्यांपासून धोका असल्याचं म्हणत थेट पोलीस संरक्षणाची मागणी केलीये. चिराग हा डोंबिवलीचा रहिवासी असून तो नेहमी कल्याण-डोंबिवलीत हा प्रवास दुचाकीवरुन करतो. त्यामुळे पोलिसांनी मला संरक्षण द्यावे. त्याचे पैसे भरण्याची माझी तयारी असल्याचे चिरागने सांगितले आहे.
सिमेंटचा रस्ता तयार करताना संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणं गरजेचं असतानाही रस्त्याच्या तब्बल ६० टक्के भागात पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आलेत. हे पेव्हर ब्लॉक सध्या नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. हे पेव्हर ब्लॉक ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी बसवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कल्याणमध्ये अनेक ठिकाणी सिमेंटचे पैसे वाचवून भ्रष्टाचार करण्यासाठीच अशाप्रकारे पेव्हर ब्लॉक्सचा वापर होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केला होता.
ज्याठिकाणी हा अपघात घडला, तिथे बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते मूळ रस्त्यापासून खाली दबले गेलेत. त्यामुळं बाइक चालकांचे इथे अनेकदा अपघात होत असतात. याविरोधात कल्याणच्या नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही अनेकदा पालिकेकडे तक्रार केली. मात्र हा रास्ता एमएसआरडीसीकडे येत असल्याचे सांगत पालिकेने दरवेळी हात वर केले. त्यामुळे आता केडीएमसी आणि एमएसआरडीसी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागलीये. कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनीही याबाबत अधिवेशनात मागणी करणार असल्याचे म्हटले. तर एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश केडीएमसी आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आतातरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.