मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना....
गालबोट लागणारी घटना घडली आणि 2017 च्या सरतेवेळी जाणवलं की मुंबईकरांना यावर्षी अनेक दुर्घटनांना समोर जावं लागलं. यामध्ये रेल्वे दुर्घटना, आगीत होरपळून मृत्यू आणि इमारत कोसळून मृत्यू यामध्ये नाहक निष्पाप 118 मुंबईकरांचा बळी गेला आहे.
पाहूया 2017मध्ये मुंबईत घडलेल्या मोठ्या दुर्घटना
लोअर परेल परिसरातील कमला मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या मोजोस ब्रिस्ट रेस्टॉरंटला भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 11 महिला आणि 3 पुरूषांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमींना केईएम आणि सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
रूफ टॉपवर असलेल्या या मोजोसमध्ये गुदमरून या लोकांचा नाहक बळी गेला आहे. याप्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेत्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या मोजोसमध्ये गायक शंकर महादेवनच्या मुलाचे शेअर्स असल्याचं कळतंय.
29 सप्टेंबर 2017 हा दिवस रेल्वे प्रवाशांसाठी खरोखरचा ब्लॅकफ्रायडे ठरला. पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात अफवा पसरून झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. यावरून अनेक वादविवाद झाले अजूनही सुरूच आहेत. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली.आता एल्फिन्स्टन स्थानकावरील पूल लष्कराकडून बांधला जातो आहे.
घाटकोपर साकीनाका येथे पहाटे एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. साकीनाक्याच्या खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये असलेल्या भानू फरसाण गाळा नंबर-१ या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. यावेळी भानू फरसाण दुकानासह इतर दुकानातील कामगार झोपेत होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कळायच्या आत 12 कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
117 वर्षे जुनी असलेली भेंडीबाजार परिसरातील हुसैन इमारत कोसळून 34 जणांचा मृत्यू झाला आहे. य47 जणांची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली तर दुर्घटनेत 15 जखमी झाले. भेंडीबाजार परिसरातील 250 इमारतींचा सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट या ट्रस्टकडून पुनर्विकास सुरु झाला होता. मे 2017 मध्ये हुसैनी इमारत पाडण्याची परवानगीही मिळाली होती. समूह विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या इमारतीतील रहिवाशांना मृत्यूने गाठले
घाटकोपरमधील दामोदर पार्कजवळील सिद्धी साई ही चार मजली इमारत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला तर 11 जखमी झाले. ही इमारत 1981 मध्ये बांधण्यात आली होती. पालिकेच्या नियमानुसार 30 वर्षांनी इमारतीचे स्टक्चरल ऑडित होणे आवश्यक आहे. मात्र 36 वर्ष होऊनही इमारतीचं स्टक्चरल ऑडिट झाले नव्हते. या इमारतीमध्ये 12 कुटुंब वास्तव्यास होते.
23 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनलजवळ असलेल्या दाना बंदर या भागामध्ये एल.सी.सी कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत सहा जणांता मृत्यू झाला होता. अगदी चिंचोळी रस्ता असल्यामुळे तेथे पोहोचणं देखील कठीण होतं.