मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना टळली. विसर्जनासाठी जाणाऱ्या ताफ्यातली बोट समुद्रात बुडाली. बोटीतल्या पाचही जणांना वाचवण्यात यश आलं. काजल मेयर, अवनी, निलेश भोईर, अदनान खान, अनिता हे भाविक राजाच्या विसर्जनासाठी चालले होते. यावेळी त्यांची बोट समुद्रात बुडाली. मात्र या पाचही जणांना वाचवण्यात आलं आहे. त्यांच्यावर नायर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ढोल-ताशांच्या गजरात 21 तासानंतर सोमवारी सकाळी 9 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. पण या दरम्यान मोठा अनर्थ टळला. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. लिफ्टच्या माध्यमातून बापांचं समुद्रात विसर्जन करण्यात आलं. यावेळी विसर्जन पाहण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची बोट अचानक बुडाली.
वजन वाढल्यामुळे बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बोटीमधले लोकं समुद्रात पडल्यानंतर लगेचच जीवन रक्षकांनी समुद्रात उड्या घेत या लोकांना वाचवलं.
गणपती विसर्जनादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात रविवारी 10 वाजेपर्यंत 11 वोकं बुडाले. रायगड आणि जालनामध्ये 3, सातारा आणि भंडारामध्ये 2 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 1 जण बुडाला.
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला रविवारी सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. गिरगाव चौपाटीवर पोहोचण्यासाठी लालबागच्या राजाला 21 तास लागले. मंडप ते गिरगाव चौपाटी पर्यंतचं अंतर 8 ते 9 किलोमीटर आहे. मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.