"नाकाने कांदे सोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी...", नाराजी नाट्यावरून आचार्य तुषार भोसलेंची बोचरी टीका

भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर साधला निशाणा!

Updated: Sep 12, 2022, 12:25 AM IST
"नाकाने कांदे सोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी...", नाराजी नाट्यावरून आचार्य तुषार भोसलेंची बोचरी टीका  title=

मुंबई : दिल्ली इथं पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनातील नाराजीनाट्य पाहायला मिळालं. व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची भाषणं झालीत. त्यानंतर कार्यकर्ते अजित पवारांच्या भाषणाची वाट पाहत होते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भाषणासाठी गेल्यावर अजित पवार उठून बाहेर गेले. याचाच धागा पकडत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचा दिल्लीत बोलावून अपमान केला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: आग्रह करूनसुद्धा त्यांनी भाषण केलं नाही म्हणून आकांडतांडव करणाऱ्या आणि नाकाने कांदे सोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीच्या कार्यकारिणीमध्ये बोलू दिलं नाही. अरे किमान स्वत:च्या पक्षात तरी त्यांचा मान सन्मान ठेवा मग दुसऱ्यांना अक्कल शिकवा, असं तुषार भोसले म्हणाले. तुषार भोसले यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

ठिणगी कशी पडली ?
राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले होते. सर्वच नेत्यांना बोलण्याची संधी दिली जात होती. अगोदर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाषण केलं. त्यात अजित दादांचा उल्लेख करण्यात आला त्यावेळेस संपूर्ण सभागृहात कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. दादांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना काहीवेळ आपलं भाषण थांबवावं लागलं. नंतर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाषण केलं. कार्यकर्ते अजित पवारांच्या भाषणाची आतुरतेनं वाट पाहत होते. तेवढ्यात प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना भाषण करण्याची विनंती केली. तेंव्हा मात्र अजित पवारांच्या समर्थकांनी मोठा गदारोळ केला.

'दुसरं स्टेशन येईल…'
'अजित दादांना बोलू द्या...' जोरदार घोषणाबाजी अजित पवार समर्थकांनी सुरू केली. तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. वातावरणात तणाव निर्माण झाला. हा तणाव निवळण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनी (Prafulla Patel) पुन्हा हातात माईक घेतला आणि एक स्टेशन गेल्यावर दुसरे स्टेशन येईल असं सांगून सर्व कार्यकर्त्याना शांत राहण्याचं आवाहन केलं. जेंव्हा जयंत पाटलांचं भाषण सुरू झालं तेंव्हा अजित पवार व्यासपीठावरून उठले आणि थेट बाहेर पडले. 
त्यांना बोलवण्यासाठी प्रवक्ते रविकांत वरपे निघाले. त्यांनी अजित पवारांना बोलवून आणलं. अजित पवार व्यासपीठावर येऊन बसले. त्यानंतर काही वेळातच जयंत पाटील यांचं भाषण संपलं. तेंव्हा पुन्हा प्रफुल्ल पटेलांनी अजित पवाराचं नाव पुकारले. तर अजित पवार उठून बाहेर गेले. त्यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे पण बाहेर पडल्या. तेंव्हा अजित पवार समर्थकांनी मोठा गोंधळ घातला. 'अजित दादा इथे बसून होते. तुमच्या आग्रहाखातर अजित दादांना बोलण्याची विनंती केली पण ते निघून गेले. पण शरद पवारांच्या (Sharad Pawar) समारोपाच्या भाषणापूर्वी अजित दादांचे भाषण होईल,' असं आश्वासन देऊन कार्यकर्त्यांना शांत केलं. 

तोवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदी गाण्याचं उद्घाटन झाले. तरीही अजित पवार परतले नाहीत. अखेर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची समजूत घातली. थोड्याच वेळात अजित पवार पुन्हा व्यासपीठावर आले. तोपर्यंत शरद पवारांचं समारोपाचे भाषण सुरू झालं होतं. कार्यकर्त्यांची इच्छा अपूरी राहीली. अजित पवारांचे भाषण झालंच नाही. यावर झी २४ तासने अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, 'बरीच भाषणं झाली … सर्व दिग्गज बोलले… मला जे बोलायचंय ते महाराष्ट्रात बोलेन, असं उत्तर दिलं. यावरून जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातला वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून आलं.