Mumbai Municipal Elections : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं होतं. यंदाची निवडणूक शिंदे गट आणि मनसे एकत्र लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र अशातच भाजपच्या आजी नगरसेवकांसाठी टेन्शन वाढवणारी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समजत आहे.
मुंबईत महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या 50 टक्क्यांपेक्षा विद्यमान जास्त नगरसेवकांची तिकीट कापली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. ज्या विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापली जाणार आहेत ते त्यांच्या वॉर्डमध्ये अकार्यक्षम असल्याचा भाजपचा सर्वे सांगत असल्याची माहिती आहे. अर्ध्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं जाणार असल्याने मुंबईतील भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाचं आता टेन्शन वाढलं आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय समीरकरणांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक असणार आहे. मुंबई महापालिका भाजपला आपल्या ताब्यात हवी आहे. यासाठी भाजप आपली सर्व ताकद पणाला लावणार असून गृहमंत्री अमित शहा लालबागच्या दर्शनासाठी आले होते तेव्हा त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं होतं.
शिवसेनेला गाडून मुंबई जिंकण्याची संधी आहे, उद्धव ठाकरे यांनी जो धोका दिला आहे त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी, असं अमित शहा म्हणाले होते. त्यामुळे भाजप कशा प्रकारे आपली रणनिती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापासूनच सगळ्या पक्षांनी निवडणुकीसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असली तरी मुंबई महापालिकेमध्ये कोण सत्ता मिळवणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.